#Corona पेणमध्ये कठोर उपाययोजना, विदेशातून आलेले 6 नागरिक निगराणीखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

जागतिक पातळीवरती धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दंड थोपटले आहे. पेण तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व पेण नगरपरिषदेने अनेक उपाययोजना केल्या आहेत.

पेण शहरातील आठवडा बाजार, स्विमिंग पूल, व्यायाम शाळा, शाळा कॉलेजेस, चित्रपट गृह, खासगी क्लासेस हे यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. तसेच शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पेण नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे. औषधांची दुकाने, दूध डेरी, भाजीपाला मार्केट, व पेट्रोल पंप मात्र सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या 50% घटविण्यात आली आहे. पेण ते पनवेल नव्याने सुरू होणारी रेल्वे गाडी सुद्धा अनिश्चित काळा करिता रद्द करण्यात आली आहे. जुन्या रेल्वे गाड्या मात्र नेहमीच्या वेळेत सुरू आहेत.

पेण तालुक्यातील परदेशातून आलेल्या 6 नागरिकांना प्रशासनाने स्वतंत्र कक्षात निगराणी खाली ठेवले आहे. शहरातील मशिदींमध्ये मध्ये सुद्धा 31 मार्च पर्यंत शुक्रवारची सामूहिक नमाज होणार नाही. कोरोनाच्या भीतीने पेणच्या बाजारपेठ ओस पडल्या असून शहरातील व्यवसायाची गती अतिशय मंदावली आहे तोंडाचा मास्क, सँनेटायझर व हॅन्ड ग्लोज यांना मात्र दिवसेंदिवस मागणी वाढतच चालली आहे़.

राज्यातील आकडा वाढला
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी नगर शहरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीकडे सरकली आहे. देशातही कोरोना रुग्णांची संख्या 160 पार गेली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच प्रमुख मंदिरे आणि पर्यटन स्थळे देखील बंद करण्यात आली आहे.