कोरोनाविरोधातील लढ्यात सर्वांचे सहकार्य गरजेचे – ॲड. अनिल परब

496

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रत्नागिरीच्या नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी आणि कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे. काही कारणास्तव आपल्याला जिल्ह्यात येणे शक्य नाही. मात्र, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून आपण नियमित आढावा घेत आहोत. त्यानुसार पुढील दिशा ठरवण्यात येत आहे, असेही परब यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण बरा झाला असून इतर दोघांची प्रकृती सुधारत आहे. कुणालाही सर्दी, खोकला, ताप असेल त्यांनी तातडीने रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. तसेच संशयित रुग्णांनी स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखणे आणि जिल्हा कोरोनामुक्त करणे यात प्रत्येक नागरिकाचे सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री परब यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या