मुंबईत जमावबंदी! आता संपूर्ण राज्यात थिएटर्स, स्विमिंग पूल, व्यायामशाळा बंद

585
फोटो- प्रातिनिधीक

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून शहर आणि उपनगरात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक व्यक्तींना आता एकत्र येता येणार नाही. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होतो. म्हणून मुंबईकरांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठीच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. याबरोबरच पोलिसांनी खासगी टूर ऑपरेटर्स आणि टॅव्हल कंपन्यांवरही निर्बंध घातले आहेत. सर्व आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय टूर तसेच मुंबई दर्शन सहल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रुप बुकिंग करून सहलीला जाणारेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच आज राज्य सरकारने दिला.

आज संभाजीनगरात एक आणि कल्याणमध्ये एक असे दोन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 33 वर गेली आहे. संभाजीनगरात एका 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचे सांगण्यात येते. या महिलेची प्रकृती स्थिर असून या महिलेच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कल्याणमध्ये सापडलेला रुग्णही काही दिवसांपूर्वी परदेशात गेला होता. तो 6 मार्चला हिंदुस्थानात परतला. 11 तारखेला त्याला त्रास जाणवू लागल्याने कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या करण्यात आल्या त्रा पॉझिटिव्ह आल्या. कल्याणमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता दोन झाली आहे.

बुलढाण्यातील मृत्यू कोरोनाने नाही
बुलढाण्यातील कोरोना संशयिताचा शनिवारी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र हा रुग्ण कोरोनाचा नसल्याचा अहवाल आला आहे. हा रुग्ण सौदी अरेबियातून आला होता. त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.

रुग्ण, कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यास कारवाई
पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात कोरोना रुग्णावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. विशेष म्हणजे रुग्ण राहत असलेल्या सोसायटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही याप्रकरणी जबाबदार धरण्यात येईल, असेही नवल किशोर म्हणाले.

पत्रक पोहोचले नसले तरी आदेशाचे पालन करा
राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांना पत्रक पाठवून त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आता जिल्हाधिकाऱयांमार्फत सर्व संबंधित संस्थांना आदेश जारी होतील. राज्यातील चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश शुक्रवारी राज्य सरकारने जारी केले होते, पण तरीही सरकारच्या आदेशाची प्रत मिळाली नाही असे कारण सांगत काही मल्टिप्लेक्सच्या मालकांनी चित्रपटाचे खेळ सुरू ठेवले होते. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणली तेव्हा राज्य सरकारचे आदेश आहेत. आदेशाच्या पत्रकाची वाट बघण्याची गरज नाही. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुंबई-पुण्यातील निर्बंध आता राज्यभर
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमधील सिनेमा-नाटकाची थिएटर्स, स्विमिंग पूल, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच दिले होते. आता हे निर्बंध संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व सिनेमा-नाटय़गृहे, व्यायामशाळा, स्विमिंग टँक बंद राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 11च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून योजण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध रुग्णालयांत सुरू केलेले विलगीकरण कक्ष, राज्यातील व्यायामशाळा, स्विमिंग पूल, चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय व इतर उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली. त्यावर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे सांगण्यात येते.

‘सार्क’च्या इमर्जन्सी फंडासाठी हिंदुस्थानकडून 1 कोटी डॉलर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने रविवारी बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या ‘सार्क’मध्ये समावेश असलेल्या सात देशांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने चर्चा झाली. यावेळी मोदींनी कोरोनाशी लढण्यासाठी इमर्जन्सी फंडाचा प्रस्ताव ठेवला आणि हिंदुस्थानकडून एक कोटी डॉलर्स देण्याचीही घोषणा केली.

– कोरोनाग्रस्त रुग्णांनी विलगीकरणास सहकार्य केले नाही तर त्यांना नजरकैदेत ठेवणार. कोरोनाग्रस्त रुग्ण किंवा संशयित रुग्ण पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांचा पहारा ठेवणार.

– एमपीएससी परीक्षा पुढील आदेश किंवा सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

– के.ई.एम., जे.जे. आणि हाफकिनमध्येही कोरोना टेस्ट होणार.

राज्यातील रुग्ण
पुणे ः 16  मुंबई ः 5  रायगड ः 1 कल्याण ः 1  नगर ः 1  नागपूर ः 4  ठाणे ः 1  यवतमाळ ः 2 नवी मुंबई ः 1  संभाजीनगर ः 1

आपली प्रतिक्रिया द्या