कोरोना ट्रेस-टेस्ट-आयसोलेशनमध्ये संभाजीनगर देशात दुसऱ्या क्रमांकावर, राजधानी दिल्लीलाही मागे पाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी शासन निर्देशानुसार ट्रेस-टेस्ट-आयसोलेशन या प्रक्रियेचा वापर केला जात आहे. या प्रक्रियेनुसार रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या कोरोना चाचण्या केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना उपचारासाठी आयसोलेट केले जात आहे. तर आवश्यक असलेल्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. ही प्रक्रिया गतीने राबविण्यात राजधानी दिल्लीला देखील मागे टाकत देशात संभाजीनगर शहर दुसऱ्या स्थानावर आले असल्याची माहिती आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

अनलॉक-१ सुरू झाल्यानंतर जून महिन्यात महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहराच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर माहिती देताना स्पष्ट केले होते की, काही खासगी संस्थांच्या माध्यमातून विविध शहरातील संभाव्य रुग्ण संख्येबद्दल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार शहरात ९ जूनपर्यंत २१ हजार रुग्ण होतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र आता जुलै महिना संपत आला असतानाही आजपर्यंत संभाजीनगरात रुग्णांची संख्या १२ हजारांच्या घरातच आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढू न देण्यात महापालिकेला यश आले आहे. मनपाने २० मेपर्यंत इस्टिट्यूशनल (संस्थात्मक) क्वारंटाइनचे प्रमाण वाढवले होते. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. कोरोनाबाधित एखादा व्यक्ती आढळून आल्यावर त्याच्या घरातील सगळ्यांना व त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमधल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करणे, दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांचे स्वॅबचे नुमने घेऊन चाचणीनंतर त्यातील पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचारासाठी दाखल करणे अणि बाकीच्यांना काही दिवस क्वारंटाइन सेंटरमध्येच ठेवणे, अशी ही पद्धत म्हणजेच ट्रेस-टेस्ट आणि आयसोलेट. याच पद्धतीप्रमाणे मनपाची यंत्रणा कार्य करत आहे. शासन निर्देशानुसार रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक १५ व्यक्तींना शोधून त्यांची टेस्ट करून आयसोलेट व क्वॉरंटाइन करण्याच्या कामाला मनपाने गती दिली आहे. त्यातच आता अ‍ॅण्टिजेन टेस्टचा कमी वेळात रिझल्ट देणारा पर्याय उपलब्ध झाल्याने मनपाचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे महापालिकेने ट्रेस-टेस्ट-आयसोलेटची प्रक्रिया राबविण्यात झेप घेत देशात दुसरे स्थान मिळविले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

दहा लाख लोकसंख्या मागे शहरात ६६,४७४ टेस्ट
आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रतिदशलक्ष (परमिलियन टेस्ट) चाचण्यांचे प्रमाण हे ८० हजार आवश्यक आहे. यात संभाजीनगरने मंगळवारी हे प्रमाण ६६,४७४.३५ एवढे नोंदले गेले आहे. संभाजीनगरपेक्षा गोवा शहराचे प्रतिदशलक्ष चाचण्याचे प्रमाण सर्वाधिक ६७,६८९.३ एवढे असून पहिल्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर देशाची राजधानी दिल्लीचा नंबर असून, दिल्लीचे हे प्रमाण ४३,७०८ एवढे आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचे एकूण प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे कोरोना चाचण्यांचे प्रमाण १४ हजार इतके आहे. महाराष्ट्रापेक्षा राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचे प्रमाण अधिक आहे, असेही आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.