
कोरोना महामारीच्या लाटांवर लाटा येत आहेत. पण त्यामुळे खचून जाऊन अथवा हताश होऊन कोरोनाची समस्या सुटणार नाही. देशावरील संकटाच्या या काळात आपापसातील सर्व मतभेद आणि हेवेदावे बाजूला ठेवून आपण कोरोनाशी लढायला हवे. सरकारने जनतेच्या सहकार्याने महिन्याला 20 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले तर वर्षअखेरीस आपला देश कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेला असेल, असा दिलासादायक दावा हैदराबाद येथील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीचे (एआयजी) संस्थापक ‘पद्मविभूषण’ डॉ. नागेश रेड्डी यांनी केला आहे.
कोविडच्या सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये सध्या परदेशी पद्धतीचा प्रभाव असून हा उपचार हिंदुस्थानी वातावरणाशी मेळ घालत नाही. त्यामुळे आम्ही कोविडसाठी चार भागांमध्ये नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. या उपचार पद्धतीच्या माध्यमातून एआयजीच्या 52 डॉक्टरांच्या पथकाने 20,000 कोविड रुग्णांवर उपचार केले. यातील 99 टक्के रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती डॉ. रेड्डी यांनी दिली.
कोरोनाविरुद्धची लढाई ही मानवता वाचवण्यासाठीची आहे. त्यामुळे आमच्या एआयजीने बनवलेल्या देशी उपचार पद्धतीचे पेटंट आम्ही घेणार नाही. त्याऐवजी देशकार्य म्हणून आम्ही पुस्तिका स्वरूपात या कोविड उपचार पद्धतीची सविस्तर माहिती देशातील एक लाख डॉक्टर्स आणि वैद्यकीयतज्ञांना देणार आहोत, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.
सर्व शास्त्र्ाज्ञांनी एकत्र येऊन रणनीती तयार करावी
देशाची लोकसंख्या पाहता कुणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. जूनच्या अखेरीस संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. त्यासाठी सर्व शास्त्र्ाज्ञांनी एकत्र येऊन येणारी लाट कशी रोखता येईल याची एक रणनीती तयार करावी, असे आवाहन डॉ. नागेश रेड्डी यांनी केले.




























































