
हिंदुस्थानात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार उडवला आहे. देशातील नागरिकांना प्राथमिकतेने लस देण्याची गरज असताना ही लस निर्यात का केली असा सवाल या विरोधकांनी मोदी सरकारला केला आहे. देशाच्या अनेक भागात लसींचा तुटवडा असून, लोकांना लस मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत आहे. या लाटेमुळे देशात जे नुकसान झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी हिंदुस्थानने कोरोनावरील लसींची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला होता. हिंदुस्थानने लसींची निर्यात थांबवल्याने हिंदुस्थानच्या मदतीवर अवलंबून असलेल्या देशांचे वांदे झाले आहेत. या निर्यात बंदीमुळे इतर देशांना हिंदुस्थानकडून जी लस पुरवली जाणार होती त्यात 14 कोटी लसींच्या मात्रेची तूट निर्माण झाली आहे.
संपूर्ण जगात हिंदुस्थान हा लसींचा मोठा उत्पादक असून विकसनशील देशांना हिंदुस्थानचा मोठा आधार होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जी भयंकर परिस्थिती देशात निर्माण झाली ती पाहिल्यानंतर आणि लसींच्या तुटवड्यावरून टीका झाल्यानंतर हिंदुस्थानने कोविशील्ड लस इतर देशांना निर्यात करणं मार्च महिन्यात थांबवलं होतं. गेले तीन महिने कोव्हॅक्सिन लसही देशाबाहेर पाठवण्यात आलेली नाहीये. यामुळे विकसनशील देशांना जी लस मिळणं अपेक्षित होतं त्यात 14 कोटी लसींची तूट निर्माण झाली आहे. ही तूट लवकरच 19 कोटींपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. डेली मेल नावाच्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण हे भीतीदायक आहे. कोरोनाच्या यापुढेही लाटा येत राहतील आणि त्या थांबवायच्या असतील तर मास्कर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे यासोबतच वेगाने लसीकरण मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे. देशात लसीकरण मोहीम सुरू झाली खरी मात्र पुरेसा साठा नसल्याने लसी मिळण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत.
cowin वर आता स्पुटनिक व्ही लसीचाही पर्याय
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीनंतर केंद्र सरकारने स्पुटनिक व्ही या तिसऱया लसीला परवानगी दिली आहे. स्पुटनिक व्ही लसींच्या दोन खेप हिंदुस्थानात पोहोचल्या असून रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सदस्याने घेतली. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.
कोविन अॅपवरून स्लॉट बुक करताना पिनकोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे. स्पुटनिक व्ही लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी निगडित रुग्णालयांची यादी समोर दिसेल. स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस 948 रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत 995 रुपये 40 पैसे इतकी असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस हिंदुस्थानात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





























































