
कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या गावांतील कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून मोहीम उघडण्यात येत आहे. मात्र एवढ्या प्रमाणात जनजागृती होऊनही या कोरोना योद्ध्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील साखरी नाटे गावात त्याचप्रमाणे अलिबागच्या बोडणी गावात या आरोग्य योद्ध्यांना असाच अनुभव आला आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिसांना प्रवेश बंदी करण्याबरोबरच त्यांच्यावर हल्ला करण्याचा संतापजनक प्रकार या गावांमध्ये घडला आहे.
अलिबागमधील बोडणी गावात कोरोनाचे 72 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील कोरोना रोखण्यासाठी तहसीलदार, पोलिसांसह आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिकाही पोहोचली. मात्र ग्रामस्थांनी आक्रमक होत कन्टेंन्मेंट झोनचे बॅरिकेड तोडले. अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत अंगावर धावून गेले.
असाच प्रकार राजापूरमधील साखरीनाटे गावात घडला. 32 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य पथक रुग्णवाहिका घेऊन गेले. त्यावेळी महिलांनी नर्सना शिवीगाळ तर केलीच पण सहाशे जणांच्या जमावाने आरोग्य पथक तसेच पोलिसांवर हल्ला चढवला. दगडफेक करण्यात आली.
विधानसभाध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचिवाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अध्यक्षांच्या विधान भवनातील दालनाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. अध्यक्षांच्या इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
अब्दुल सत्तार यांनाही लागण
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांना शासकीय बंगल्यातच क्वारंटाईन करून उपचार सुरू झाले आहेत. सरकारी बंगल्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे.

























































