
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनच्या वूहानमधून कोरोना जगभरात पसरला आणि काही काळातच जगाला विळखा घातला. कोरोनाने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका दिला आहे. अनेक देशातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अमेरिका, रशिया, इटली, ब्रिटन यांसारखे देशही कोरोनाच्या प्रकोपासून वाचू शकले नाही. तरीही जगातील काही देश आहेत, जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडल्याची अधिकृत नोंद नाही. या विशेषतेमुळे हे 10 देश चर्चेत आले आहेत.
- पलाऊ
- मायक्रोनेशिया
- मार्शल द्वीप समूह
- नाऊरू
- किरिबाती
- सोलोमन द्वीप समूह
- टुवालू
- समोआ
- वानुटू
- टोंगा
या 10 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, सध्या या देशांची स्थिती बिकट झाली आहे. कोरोनाचा रुग्ण नसला तरी ढासळलेली अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या उदरनिर्वाहाची समस्या या देशांपुढे उभी ठाकली आहे. प्रशांत महासागरातील एका बेटावर वसलेल्या पलाऊ देशाची बहुतांश अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. 1982 साली या देशात ‘द पलाऊ हॉटेल’ नावाचे पहिले हॉटेल सुरू झाले. त्यावेळी ही खूप मोठी गोष्ट होती. 2019 मध्ये पलाऊमध्ये 90 हजार पर्यटक आले होते. त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून आहे. कोरोनामुळे पलाऊ देशाच्या सीमा प्रवाशांसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बंद करण्यात आल्या. यामुळे पलाऊमध्ये कोरोनाने शिरकाव केला नाही. मात्र, कोरोनाने देशाच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. सध्या पलाऊमधील सर्व हॉटेल बंद आहेत. रेस्टॉरंट, भेटवस्तूंची दुकाने सर्व बंद आहे. परदेशात गेलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यासाठीच सध्या हॉटेलचा उपयोग होत आहे. या संकटाच्या काळात हॉटेलमधील सर्व खोल्या रिकाम्या असूनही हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जाते. अजून कुणालाच कामावरून काढलेले नाही. मात्र, त्यांच्या कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. हा त्या कामगारांसाठी दिलासा आहे. जगभरातील कोरोनाची स्थिती बघता सध्यातरी पर्यटन सुरू होण्याची शक्यता नाही.
पलाऊच्या पूर्वेला चार हजार किलोमीटरवर असलेल्या मार्शल बेटांवरही कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, तिथेही अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. मार्शल बेटांवरील हॉटेल रॉबर्ट रीमर्समध्ये पूर्वी 75-80 टक्के खोल्या भरलेल्या असायच्या. मात्र, सध्या सर्व खोल्या रिकाम्या आहेत. आशिया आणि अमेरिकेतील पर्यटक इथे येतात. मात्र, कोरोनामुळे देशाच्या सीमा बंद झाल्यानं पर्यटन क्षेत्राला फटका बसला. मार्शल बेटांवर कोरोनामुळे 700 नोकऱ्या गेल्याची भीती वर्तवली जाते. इथल्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. 1997 नंतरची रोजगारातील ही सर्वात मोठी घट आहे. पर्यटनासोबतच मार्शल द्वीपसमूहाला मासेमारीचाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या फैलावाची भिती असल्याने इतर देशांच्या बोटी मार्शल बेटांच्या बंदरात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इंधन मिळत नसल्याने मासेमारी नौका बंद आहेत. तसेच कोरनामुळे मासेमारीवरही बंदी आहे. वानुटूमधील 80 टक्के लोकसंख्या शहराबाहेर राहते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांना कोरोना आणि त्यामुळे झालेल्या सीमाबंदीचा फटका बसलेला नाही. मात्र, तरीही वानुटू देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आहे. 1980 साली वानुटू स्वतंत्र झाला. त्यानंतर पहिल्यांदाच वानुटू अशा आर्थिक घसरणीला सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाचे संक्रमण नसलेले जगातील या 10 देशांनी सीमाबंदी करून देशाला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवले असले तरी या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. सध्याच्या काळात पर्यटन सुरू होण्याची शक्यता नसल्याने आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. सीमबंदी उठवल्यास देशात कोरोना फैलावाची भीती आहे. कोरोनापासून बचावासाठी जगभरात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. तर आर्थिक फटका बसलेल्या या देशांनाही कोरोना संकट कधी संपणार आणि पर्यटन, मत्स्य व्यवसाय कधी सुरू होणार असा प्रश्न पडला आहे.

























































