संपूर्ण देशभरात चिंता; हिंदुस्थानातील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 28 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

चीनमध्ये हाहाकार उडवून दिलेल्या ‘कोरोना’ विषाणूने आता संपूर्ण हिंदुस्थानला चिंतेत लोटले आहे. हा विषाणू देशभर वेगाने फैलावू लागला आहे. गेल्या दोन दिवसांतच कोरोनाग्रस्तांची संख्या 28 वर गेली आहे. त्यामुळे सरकार तसेच प्रशासकीय यंत्रणा प्रचंड हादरून गेल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 19 नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला या विषाणूने डोके वर काढून सर्वांचीच चिंता वाढवली आहे. सोमवारी दोन, तर मंगळवारी आठ संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बुधवारी इटलीहून परतलेल्या आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. इराणमध्ये अडकलेले जे हिंदुस्थानी मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत त्यांच्या तपासणीनंतर सरकार तेथेच तात्पुरती प्रयोगशाळा उभारणार आहे. यासाठी चार शास्त्र्ाज्ञांना तेहरानमध्ये पाठवले जात आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली.

परदेशात 17 हिंदुस्थानींना कोरोनाची लागण

परदेशात कोरोनाची लागण झालेले 17 हिंदुस्थानी आहेत. यातील 16 जण जपानच्या जहाजावर आहेत, तर एक कोरोनाबाधित हिंदुस्थानी दुबईत आहे. सरकारने आतापर्यंत 723 हिंदुस्थानींना चीनमधून मायदेशी आणले आहे. याकामी एअर इंडियाचे 6 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशाचप्रकारे जपानच्या जहाजांवरून 119 हिंदुस्थानींना आणण्यात आले अशी माहिती परराष्ट्र
राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी संसदेत दिली.

या ठिकाणी झाली क्रिनिंग

  • विमानतळावर आतापर्यंत 5 लाख 89 हजार प्रवाशांची क्रिनिंग करण्यात आली आहे.
  • 15 हजार लोकांची बंदरावर क्रिनिंग केली आहे.
  • हिंदुस्थान-नेपाळच्या सीमेवर 10 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
  • 27 हजार लोकांना कम्युनिटी क्रिनिंगवर ठेवले आहे.
  • देशात सध्या कोरोनाची चाचणी करणाऱया 15 प्रयोगशाळा आहेत. विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे आणखी 19 प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

परदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांची विमानतळावरच क्रिनिंग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानात आतापर्यंत केवळ 12 देशांतून येणाऱया विमान प्रवाशांची तसेच विमानांची तपासणी केली जात होती, मात्र कोरोनाचा फैलाव वाढल्याने आता सर्व देशांतून येणारे विमान प्रवासी तसेच विमानांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाग्रस्त प्रवासी शहरात फिरल्यास इतर नागरिकांना कोरोनाची लागण होईल. त्यामुळे विमान प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे.

नौदलाने कसरती पुढे ढकलल्या

कोरोनाचा धोका वाढल्याने देशात सर्व स्तरावर सतर्कता बाळगली जात आहे. नौदलानेही ‘मिलन 2020’ कसरती पुढे ढकलल्या आहेत. तब्बल 40 देश या कसरतींमध्ये सहभागी होणार होते. 18 ते 20 मार्चदरम्यान बंगालच्या उपसागरात या कसरती होणार होत्या. सहभागी देशांना कसरती पुढे ढकलल्याचे नौदलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

‘कोरोना’ उपचारासाठी इन्शुरन्स कव्हर द्या!

कोरोना व्हायरसची लागण हा गंभीर आजार आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णावर विविध पातळ्यांवर उपचार करावे लागतात. अनेक तपासण्याही करणे गरजेचे आहे. या उपचाराच्या खर्चाचा इन्शुरन्स कव्हरमध्ये समावेश करावा अशी सूचना केंद्र सरकारच्या विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने केली आहे. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून 70 देशांमध्ये संसर्ग पसरला आहे. 90 हजारांवर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

सरकार म्हणते, गर्दीत जाऊ नका, कुणाला हात मिळवू नका!

कोरोनाच्या फैलावामुळे खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रचंड गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, कुणाला हात मिळवू नका किंवा कुणाला हात मिळवल्यास किमान 30 सेकंद हात स्वच्छ धुवा. ज्या लोकांना सर्दी-खोकला आहे त्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा असा सल्ला आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे.