
पुन्हा वाढणारा कोरोना रोखण्यासाठी पालिकेने नियमांच्या कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली असून रेस्टॉरंट, बार, पब, हॉटेल्सवर धाडी टाकून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी रात्री वांद्रे, खार परिसरातील बार आणि हॉटेल्सवर कारवाई करून पालिकेने एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. यामध्ये एका बारच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यवस्थापनावर साथ नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई होणार आहे.
मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने पालिका सतर्क झाली असून खबरदारीच्या उपाययोजना वेगाने केल्या जात आहेत. यामध्ये पब, बार, रेस्टॉरंटमध्ये 50 ची मर्यादा असताना शेकडो जण मास्क न घालता धिंगाणा घालत असल्याचे समोर आल्याने कारवाई करण्यात येत आहे. वांद्रे पश्?चिम येथील 145 कॅफे अँड बारवर शनिवारी रात्री धाड टाकून महानगर पालिकेने 50 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. या बार मध्ये 200 ते 250 ग्राहक हजार होते. यातील एकानेही मास्क लावला नव्हता. शिवाय मोठी गर्दी करण्यात आली होती. यानुसार पालिकेने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी बारचे व्यवस्थापक प्रणय बाळकटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बार, रेस्टॉरंट रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी कोरोना विषयक सर्व प्रकारची खबरदारी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र याकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याने पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक विभागात प्रत्येकी चार पथके तैनात करण्यात आली असून कारवाई करण्यात येत आहे.
या ठिकाणीही झाली कारवाई
पाली हिल येथील आयरीश हाऊस पबवर धाड टाकून 30 हजारांचा दंड वसूल केला आहे. क्वाटर पिलर बार रेस्टॉरंटवर धाड टाकून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. खार येथील यूटर्न स्पोर्टस् बारवर धाड टाकून 20 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. या सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साध नियंत्रण कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी दादर, माहीम भागातही धडक कारवाई करून विनामास्क आढळलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच एक हॉटेल सील करण्यात आले.






























































