
कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वर्क फॉर होम करावे, असे आवाहन केले आहे. याच धर्तीवर सरकारी टेलिकॉम कंपनी ‘बीएसएनएल’ने विशेष ब्रॉडबँड डेटा प्लान लॉन्च केला आहे. Work@Home असे या प्लानचे नाव आहे. बीएसएनएलचा हा डेटा प्लान सध्याच्या लँडलाईन ग्राहकांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
जगभरात वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सरकारी आणि खाजगी कंपनीत काम करणारे अनेक कर्मचारी घरातून काम करीत आहेत. घरातून काम करत असताना लोकांना अधिक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. हेच लक्षात घेऊन बीएसएनएल आपल्या वापरकर्त्यांना विनामूल्य इंटरनेट प्लान देत आहे. या प्लानसाठी ब्रॉडबँड वापरकर्त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. हा प्लान अंदमान निकोबारसह देशातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.
विद्यमान लँडलाइन कनेक्शन असलेल्या ब्रॉडबँड वापरकर्त्यांना या प्लानचा बीएसएनएलकडून लाभ मिळणार आहे. या योजनेत ग्राहकांना 10 एमबीपीएस वेगाने दररोज 5 जीबी डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर वेग 1 एमबीपीएस पर्यंत कमी होईल. याला तुम्ही Unimited डेटा प्लान देखील म्हणू शकता.


























































