
लॉकडाऊन पाहिजे की थोडय़ा निर्बंधांसह मोकळेपणाने रहायचे हे जनतेने ठरवावे असे सांगतानाच कोविड प्रतिबंधासाठी घातलेले नियम पाळा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला. राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन चर्चा केली. मास्क न घालणाऱया आणि आरोग्याचे नियम न पाळणाऱयांवर कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा उपस्थित होते. राज्य सरकारने विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्याने राज्यातील कोरोना आटोक्यात आला होता, परंतु गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. ‘निर्बंध शिथिल केल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. तरुणवर्ग घराबाहेर पडला आहे. जणूकाही कोरोना संपलाच असेच सगळे वागत आहेत. परिणामी आपल्याच घरातील वयोवृद्धांना आपण धोक्यात आणत आहोत.’ अशी चिंता उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
‘गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढलो. नियमावली ठरवली, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही ही गंभीर बाब आहे,’ असे उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले. ‘इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ पुन्हा सुरू झाले आहेत. पाटर्य़ा, गाठीभेटी आणि सामाजिक कार्यक्रम आरोग्याच्या कोणत्याही नियमांशिवाय होताना दिसत आहेत. हॉटेल्स आणि उपाहारगृहांच्या वेळा वाढवून दिल्या, पण तिथे नियमांचे पालन होताना दिसत नाही’ अशी चिंता व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी अशा सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी भेटी देऊन तत्काळ कारवाई करावी असे आदेश दिले.
उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत पुढील आदेश दिले
- कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या क्षेत्रात टार्गेटेड तपासण्या करा. प्रत्येक रुग्णाचे किमान 20 संपर्क शोधाच.
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळलेल्या इतर आजार असलेल्या रुग्णांची पुन्हा विचारपूस करा.
- सार्वजनिक ठिकाणी नियमित जंतुनाशक फवारणी करा
- गावागावांत फिरत्या वाहनांद्वारे चाचण्या करा.
- कोविड रुग्णालयांमधील यंत्रणा वापरण्याची वेळ येऊ नये, पण त्या व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा.
- आवश्यक असेल तिथे कंटेनमेंट झोन करून त्याची अंमलबजावणी करा
- ज्या समारंभांमध्ये मास्क व अन्य नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स आणि सभागृहांचे परवाने रद्द करा.
- लॉकडाऊन उठवण्यासाठी आलेल्या व्यावसायिक संस्था, संघटनांशी पुन्हा संपर्क साधून कोरोना प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करा.





























































