
कोरोना विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 361 लोकांचा बळी घेण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. महिनाभरात देशाला तब्बल 30 लाख कोटी रुपयांचा फटका बसला असून अर्थव्यवस्थेने 30 वर्षांतील सर्वात खालची पातळी गाठली आहे.
चीनच्या कंपन्यांना 2019 मध्ये चार वर्षांत पहिल्यांदा सर्वात कमी फायदा झाला आहे. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून या फायद्यालाही उतरती कळा लागली आणि महिनाभरात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल 30 लाख कोटी रुपये म्हणजेच जवळपास 42 हजार कोटी डॉलरचे नुकसान झाले.
अमेरिकेने जगभर भीती पसरवलीय!
कोरोनाबाबत अमेरिकेनेच जगभर भीती पसरवलीय, असा खळबळजनक आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सोमवारी केला. चीनमधील आपल्या दूतावासातील कर्मचाऱयांना मायदेशी बोलावणारा अमेरिका हा पहिला देश होता. तसेच चीनच्या नागरिकांना प्रवेश नाकारणाराही हाच पहिला देश आहे. ट्रम्प प्रशासनाने आवश्यक मदत करायचे सोडून लोकांमध्ये घबराट पसरवण्याचे काम सुरू केलेय, असे ते म्हणाले.


























































