बक्कर कसाब जमाअतच्या वतीने शहरातील गोरगरीब व गरजूंच्या घरोघरी किराणा वाटप

369

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आलेला असताना, शहरातील गोरगरीब व गरजू कुटुंबीयांची उपासमार होऊ नये यासाठी बक्कर कसाब जमाअतने मदतीचा हात पुढे सरसावला आहे. शहरातील निराधार, मोल-मजुरी करणार्‍या व कामगार कुटुंबीयांना घरपोच किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या हस्ते या उपक्रमास प्रारंभ करण्यात आले. यावेळी बक्कर कसाब जमाअतचे हाजी शौकत सर, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, वहाब सय्यद, अख्तर गड्डा आदिंसह बक्कर कसाब जमाअतचे सदस्य व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

बक्कर कसाब जमाअतच्या काही सदस्यांनी शहरातील विविध भागात जावून गरजू, गरीब व निराधार कुटुंबीयांची माहिती घेतली. ही माहिती संकलित करुन गरजूंना घरपोच सर्व साहित्य असलेल्या किराणाची पिशवीचे नुकतेच वाटप करण्यात आले. हाजी शौकत सर म्हणाले की, लॉकडाऊनने हातावर काम असलेल्या अनेक नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ईस्लाम धर्माने माणुसकीचा संदेश दिला असून, या माणुसकीच्या नात्याने प्रत्येक गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये, यासाठी त्यांना किराणा वाटप करण्यात आले. कोणताही कुटुंब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, यासाठी बक्कर कसाब जमाअत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गरजूंना किराणा साहित्य दारात मिळाल्यांने लाभार्थींनी बक्कर कसाब जमाअतचे आभार मानले. तर पोलीस प्रशासनाने देखील या माणुसकीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या