सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा मच्छी खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड

कोरोना महामारीमुळे सर्व बाजार ओस पडले असल्यामुळे उरण तालुक्यातील करंजा गावातील मच्छिमारांनी पकडलेली हजारो टन मासळी मागील तीन चार दिवसांपासून बोटींमध्येच पडून होती. शुक्रवार मच्छी विकण्यासाठी बंदरात काढल्याने या बंदरात हजारो ग्राहकांची मच्छी खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. मच्छी खरेदी करताना सोशल डिस्टन्सींगचे पार तीन तेरा उडाले होते. लोकांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे बंदरावर मच्छी विकण्यासाठी पोलिसांनी कायमची बंदी घातल्याने मच्छिमारांचे अर्थिक नुकसान होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये याकरता मुंबई येथिल ससून डॉक, भाऊचा धक्का ईत्यादी ठिकाणी मच्छी उतरविण्यास बंदी करण्यात आल्यामुळे करंजा येथिल मच्छिमारांनी आपल्या मासळीने भरलेल्या नौका करंजा बंदरावर परत आणल्या आहेत. मात्र दोन-तीन दिवस झाल्याने ही मच्छी होडीतच पडून असल्याने ती खराब होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या मच्छिमारांनी उरण पोलिसांना ही मासळी बंदरावर विकण्यासाठी परवानगी मागीतली होती. पोलिसांनी देखिल मच्छिमारांचे नुकसान होवू नये या करता सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळून ती विकावी याअटीवर परवानगी दिली. मात्र शुक्रवारी या मासळी बाजारात हजारो नागरीकांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजवीले. येथे खरेदी करण्यासाठी आलेल्यांना कोरोनाचे भय नव्हते. लोकांची एकच झुंबड उडाली होती. आजच्या या गोंधळामुळे पोलिसांनी अशा प्रकारे मासळी विकण्यास लॉकडाऊन पर्यंत पुन्हा एकदा बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या