‘सामना ऑनलाईन’च्या बातमीनंतर सिरसाळ्यात प्रशासनाचा वीटभट्ट्यांवर कारवाईचा बडगा

707

सामना ऑनलाईनला प्रकाशित झालेल्या बातमीनंतर 24 तासातच परळीत प्रशासनाने वीटभट्टी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही विटभट्टी चालू ठेवल्याबद्दल परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सिरसाळा येथे विटभट्टी चालकाविरुद्ध कारवाई करीत तिघांविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागापूर, टोकवाडी, डोंगरतुकाई,मलकापूर,गंगाखेड, मलकापूर, घाटनांदूर,धर्मापुरी,सिरसाळा परिसरात वीट भट्ट्या सुरू होत्या याचे वृत्त काल प्रकाशित करण्यात आले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे.या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्य़ातील सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.असे असतानाही परळी परिसरात वीट भट्टया खुलेआम सुरू असल्याचे वृत्त सामना ऑनलाईन नी प्रकाशित केले होते.आज परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सिरसाळ्यात विटभट्टीवर जाऊन कारवाई केली यामध्ये शेख नजीब शेख नासेर, सय्युम पठाण मुहम्मद पठाण, रामेश्वर नारायण चव्हाण सर्व रा. सिरसाळा यांच्या विटभट्ट्या चालू असल्याचे निदर्शनास आले.यावरून सिरसाळाचे तलाठी युवराज सोळंके यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या