बिअर, ताडी बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दापोडी, चिंचवडमध्ये पोलीसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे संचारबंदी लागू असतानाही सर्रासपणे दारू विक्रीचे प्रकार सुरूच आहेत. दापोडी आणि चिंचवड येथे केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पोलीसांनी 9 हजार 800 रूपये किमतीच्या बिअरच्या 70 बाटल्या आणि 7 हजार 200 रूपये किमतीची 92 लिटर ताडी जप्त केली.

कोरानामुळे सध्या संचारबंदी लागू असतानाही शहरात दारू विक्री सुरूच आहे. भोसरी पोलीसांनी दापोडी येथे केलेल्या कारवाईत लुकमान हरून नदाफ आणि त्याचा भाऊ (रा. सुखवाणी रेसिडेन्सी, दापोडी) तसेच त्यांना दारू पुरविणारा केतन शितोळे (रा. सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई रविंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. 25 एप्रिल रोजी आरोपी लुकमान आणि त्याचा भाऊ मोटारीतून जात होता. पोलीसांनी मोटार अडवून तपासणी केली असता मोटारीत काल्र्सबर्गच्या 70 टीन आढळून आल्या. मात्र, लुकमानचा भाऊ मोटार घेऊन पसार झाला. लुकमानला समजपत्र देऊन सोडण्यात आले.

चिंचवड येथे केलेल्या कारवाईत राहुल प्रसाद मोरे (रा. आझाद कॉलनी, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई प्रसाद कलाटे (वय 33) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राहुलने दळवीनगर झोपडपट्टीतील एका पत्राशेडमध्ये दोन नायलॉन पोत्यांमध्ये 92 लिटर ताडीचा साठा केल्याचे आढळून आले. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.