‘कंटेनमेंट झोन’ परिसरात फिरल्यास गुन्हा दाखल होणार

1140

कोरोनाबाधित आणि कोरोना संशयितांची संख्या जास्त असलेले भाग पालिकेने ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर केले असून या परिसरात फिरण्यास मज्जाव केला आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये फिरताना आढळल्यास आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या भागात बसवलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यावेळी कोणतीही व्यक्ती संबंधित भागात आढळल्यास पोलिसांना एसएमएस जाणार आहे. यानंतर पोलीस तातडीने कारवाई करतील.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका अनेक उपाययोजना करीत असताना नागरिक मात्र नियम मोडून स्वतः बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता ‘कंटेनमेंट झोन’बाबत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खातरजमा नियमितपणे करता यावी, यासाठी या परिसरांलगत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे प्राप्त होत असलेल्या चित्रणाचे नियमित अवलोकन महापालिकेच्या व पोलिसांच्या कंट्रोल रूम मधून करण्यात येत आहे. ‘कंटेनमेंट झोन’ परिसरात लागू करण्यात आलेले नियम हे त्या परिसरातील नागरिकांच्या भल्यासाठीच आहेत. तसेच ज्या व्यक्तींना संसर्ग झाल्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ नये; या हेतूनेच ‘कंटेनमेंट झोन’ तयार करण्‍यात आले आहेत. नागरिकांनी त्यांच्या व इतर नागरिकांच्या भल्यासाठी व सुरक्षेसाठी या नियमांचे परिपूर्ण पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

  • या पद्धतीने करण्यात येत असलेल्या निर्णयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या निगराणीसाठी प्रथमच ‘व्हिडिओ अँनालिटिक्स’ या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे ‘कंटेनमेंट झोन’ परिसरात एखाद्या ठिकाणी काही व्यक्ती कॅमेऱ्यास आढळून आल्यास, किंवा एखादा व्यक्ती विनाकारण रेंगाळत असल्यास; संगणकीय प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने त्याचे अवलोकन होऊन पोलिसांना एसएमएस’द्वारे सूचना दिली जाणार आहे.
  • त्याचबरोबर ‘कंटेनमेंट झोन’ परिसरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा बाहेरील परिसरातून ‘कंटेनमेंट झोन’ परिसरात जाण्याचा प्रयत्न करणा-यांचेही अवलोकन कॅमेऱ्याद्वारे स्वयंचलित पद्धतीने केले जाणार आहे. तसेच याची सूचना देखील पोलिसांना स्वयंचलित ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होऊ शकणार आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या निगराणीचा अहवाल हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांना देखील नियमितपणे पाठविण्यात येणार आहे.

पालिकेच्या सुविधांमुळे गैरसोय टळतेय

  • ‘कंटेनमेंट झोन’ परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची देखील बृहन्मुंबई महानगरपालिका काळजी घेत आहे. याअंतर्गत प्रामुख्याने दैनंदिन गरजेच्या वस्तू सदर परिसरातच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या