शहरापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुमित पुसावळे, अभिनेता

लॉकडाऊनपूर्वीच मी सांगलीतील दिघंची गावातील घरी पोहोचलो. साधारण 2008 नंतर शिक्षणासाठी बाहेरच असल्यानं पहिल्यांदाच मी इतके दिवस घरी मुक्काम केला. कॉलेजची सेमिस्टर संपवून मोठी सुट्टी मिळालीय आणि आपण घरी आलोय असं वाटायचं. बाळूमामा मालिकेमुळे गेले दीड वर्ष महिन्यातले सलग 25-26 दिवस शूटिंग करायची सवय लागली होती. याकाळात शहरातील धावपळीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या माणसांच्या सहवासात मला मनसोक्त वेळ घालवता आला.

गावी सगळ्यांचं शेड्युल असतं तसंच माझंही होतं. तिकडं मी कुणी कलाकार नव्हतो. रोज सकाळी उठून शेतातली काम करायचो. त्यात दिवस कुठल्या कुठे निघून जायचा ते कळायचं नाही. मी मूळचा खेडेगावातला असल्यानं शेतात काम करायची मला लहानपणापासूनच आवड. बाजरी आणि मक्याची पेरणी, भूईमुग काढणे, चिकू आणि आंब्यांची बाग उतरवणे, पूर्वीसारखं जात्यावर दळण करणे अशी काम केली. घरातल्या कामांत हातभार लावला. कॅरम खेळलो, वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे – वेबसिरीजसह ‘बाळूमामा’ मालिकेचे जुने भाग आवर्जून पाहिले. या दरम्यान एक गोष्ट सगळ्यांना प्रकर्षाने जाणवली असेल. ती म्हणजे आपल्या गरजा खूप कमी आहेत. आपलं आयुष्य खूप सोपं आहे. आपणच आपल्या गरजा वाढवून त्या आणखी गुंतागुंतीच्या करतोय. मूलभूत गरजा सोडल्या तर आपल्याला जास्त गोष्टींची गरज नाहीये.

स्वतःला जास्त शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन सतत बिझी राहण्यात काहीच अर्थ नाहीये हे आता प्रत्येकाला कळून चुकलंय. मोठ्या ब्रेकनंतर नुकतंच शुटिंग सुरू झालंय. चार महिन्यांनी मी पुन्हा बाळूमामांच्या भूमिकेत शिरलोय. नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने काम सुरूय. मुंबईतल्या पावसामुळे नुकतंच आमचं एक दिवसाचं आऊटडोअर कॅन्सल झालं होत. तेव्हा आम्हालाच वाईट वाटलं होतं. आताच मोठी सुट्टी घेऊन आलोय, इतक्यात सुट्टी आम्हाला नको होती अशी प्रत्येकाची भावना होती.

बाळूमामांची शिकवण कामी आली!

कोरोनाचा फटका अनेकांना बसला. या काळात लोकांना खरी गरज होती ती एकमेकांच्या आधाराची. लोकांना नि:स्वार्थपणे मदत करण ही बाळूमामांची शिकवण या काळात कामी आली. 2007 सालच्या बारावीच्या आमच्या बॅचच्या विद्याथ्र्यांनी पैसे जमवून काही गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. यापुढे गेटटूगेदरवर खर्च न करता त्या पैशांतून दर सहा महिन्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याचं आम्ही ठरवलंय.