
तेलंगणात अडकून पडलेल्या मजुरांनी अखेर गाव गाठले. मागील दीड महिन्यांपासून घरापासून हे मजूर लांब होते. स्वगृही परतण्याची आंतरिक तळमळ आता थांबणार, असे वाटत असतानाच प्रशासनानं या मजुरांचं गावापासून दूर विलगीकरण केलं. त्यामुळं गावात पोचूनही घरी जाता येत नसल्यानं ते पुन्हा एकदा व्याकुळ झाले आहेत.
तेलंगणाच्या सीमेवरील गोंडपिंपरी तालुक्यात धाबा नावाचं गाव आहे. इथले सुमारे 25 जण तेलंगणातून परत आले. या सर्वांना गावापासून एक किलोमीटर अंतरावरील एका शाळेच्या इमारतीत क्वारंटीन करण्यात आले. या शाळेपासून अगदी हाकेवर त्यांचं घर आहे. डोळ्यांना घर दिसत असतानाही ते घरी पाय ठेवू शकत नसल्याचा दुर्दैवी प्रसंग कोरोनामुळं त्यांचावर ओढवला आहे. प्रशासन काळजी घेत आहे, याची जाणीव त्यांना आहे. मात्र उठता-बसता डोळ्यांना दिसणाऱ्या घरामुळे हे मजूर कमालीचे हळवे झाले आहेत.
गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा पुलावरून गेल्या तीन दिवसात हजारो श्रमिक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. सीमेवरून खासगी वाहनांनी हे श्रमिक स्वगाव गाठत आहेत. लॉकडाऊनमुळं तेलंगणात दीड महिना अडकलेल्या या श्रमिकांना घरी जाण्याची ओढ लागली होती. अखेर त्यांनी गाव गाठले. मात्र, गावात प्रवेश नको, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे या श्रमिकांना गावापासून लांब विलगीकरण करण्यात आलं. संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळं या सर्व श्रमिकांची प्रशासनातर्फे व्यवस्था केली जात आहे.


































































