
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेने आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज मालाड आणि वांद्रे परिसरात दोघांकडून दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडासमोर रुमाल किंवा मास्क घालावे, नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले होते. शुक्रवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. मात्र, आजही अनेक जण विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात. वारंवार तक्रार करून काही जण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशांवर पालिकेने आता कारवाई करायला सुरुवात केली असून आज वांद्रे पूर्व आणि मालाड उत्तर भागात विनामास्क फिरणाऱ्या
दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक असतानाही काही जण सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे वागून समाजाचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. त्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाई केली जात आहे. या पुढे ती अधिक तीव्र केली जाईल, असे पालिकेने सांगितले.































































