
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही चिंतेची बाब असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूदारात घट झाल्याची दिलासा देणारी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या घटणाऱ्या मृत्यूदराचे श्रेय आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालये आणि डॉक्टरांना असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थान असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 2.5 टक्क्यांपर्यंत घटल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देशातील सरासरीपेक्षा कमी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तर पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर शून्य आहे. मणीपूर, नागालँड, सिक्कीम, मिझोराम, अंदमान आणि निकोबार बेटांचा त्यात समावेश आहे.तर 14 राज्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर एक टक्क्याहून कमी आहे. देश आणि राज्यातील आरोग्य विभाग, रुग्णालये, डॉक्टर, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न या बाबींमुळेच यश मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
देशात कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात सातत्याने घट होते. कोरोनाचा मृत्यूदर कमी असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश होतो. महिन्याभरापूर्वी देशात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 2.82 टक्के होता. तर 10 जुलैला तो 2.72 टक्के होता. आता त्यात घट होऊन हा दर 2.49 टक्क्यांवर आला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यांमध्येही कोरोनाच्या तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संक्रमितांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्यवेळेत उपचार केल्याने मृत्यूदरात घट झाली आहे.





























































