
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे 48 तासांच्या आत कळवणे बंधनकारक आहे. मात्र, ज्या रुग्णालयांनी अजूनही ही माहिती दिलेली नाही, अशा रुग्णालयांनी सोमवारपर्यंत ही माहिती पालिकेला कळवावी, नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बालिंसह चहल यांनी आज दिले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता, डॉक्टर यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वारंवार संधी देऊनही माहिती न कळवणाीऱ्या रुग्णालयांवर या पुढे ‘साथरोग नियंत्रण कायदा 1897′ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती पालिकेने लपवली नसून रुग्णालयांचे प्रलंबित अहवाल पालिकेकडे उशिराने आल्यामुळे मृत्यूंच्या संख्येत तफावत आढळल्याचे पालिकेने आधीच स्पष्ट केले होते. त्या पाश्र्वभूमीवर, पालिकेने आता मृत्यूंची उशिरा माहिती देणाNया रुग्णालयांना शेवटचा इशारा दिला आहे.
औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करा!
मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये तसेच कोरोना केंद्रांमधील कोरोना रुग्णांना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत, याकरिता दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घेऊन टोसिलिझुमॅब, रेमडेसिव्हिर यासारख्या औषधांचा महिन्याभरासाठीचा पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर उपलब्ध करून घ्यावा. औषधे तयार करणाNया उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून थेट औषधे उपलब्ध करून घ्यावीत, असे निर्देशही आयुक्तांनी रुग्णालयांना दिले.






























































