
मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 884 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये 14 प्रलंबित अहवालांचाही समावेश आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 18396 वर पोहोचली असून मृतांचा आकडाही 696 झाली आहे. दरम्यान, एकाच दिवसांत 238 जण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 4806 झाली आहे.
मुंबईत मृत झालेल्या 41 जणांमध्ये 26 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 24 जणांना दीर्घकालीन आजार होते. तर 27 रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. दरम्यान, धारावीतही आज 53 नवे कोरोनाबाधित आढळल्यामुळे या ठिकाणची एकूण संख्या 1198 झाली आहे. तर दादरमध्ये आज चार नवे रुग्ण आढळल्याने या ठिकाणची रुग्णसंख्या 154 तर माहीममध्ये 11 नवे रुग्ण आढळल्याने या ठिकाणची रुग्णसंख्या 187 झाली आहे.
लक्षणे दिसणार्या प्रत्येकाची चाचणी
- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाची सर्दी, ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास अडथळा अशी लक्षणे आढळणार्या प्रत्येकाची चाचणी करण्यात येत आहे. चाचणीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून लेखी पत्र आवश्यक आहे. बाधित क्षेत्रातून येणार्या सर्व गर्भवती महिलांची चाचणी करण्यात येत आहे. डायलिसिस रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्यास चाचणीची गरज नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
- बाधित रुग्णाच्या क्लोज काँटॅक्टमध्ये आलेल्या, दीर्घकालीन आजार असलेल्यांची पाच ते दहा दिवसांच्या दरम्यान कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सुधारित मार्गदर्शक तत्तानुसार ज्यांना रुग्णालयातून घरी सोडताना सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्यास, ज्यांनी घरी विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे अशा रुग्णांना चाचणी करण्याची गरज नसल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.































































