
कोरोनाची बाधा होईल, याभीतीने धायरी येथील एका रिक्षाचालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. अनिल बाबुराव खाटपे (वय 54, रा. बडदे चाळ, धायरी) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मागील पाच दिवसांत शहरातील ही 12 वी आत्महत्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह लगड मळ्यालगत कॅनॉल जवळील झुडुपात अडकल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. संबंधित व्यक्तीच्या खिशात एक सुसाईड नोट आणि ड्रायव्हिंग लायसन्स आढळले आहे. त्यावरून त्यांचे नाव अनिल खाटपे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना अनिल यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये कोरोना विषाणूची बाधा होईल, या भीतीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘मला कोरोना आजार होईल व त्याच्या त्रासाने हाल होऊन मरण्यापेक्षा मी स्वतःच आत्महत्या करून मरतो’, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.या रिक्षा चालकाने घरामध्येही सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार रुस्तम शेख करीत आहेत.






























































