‘कोरोना’चा संशय बळावतोय! मुंबईत 5, पुण्यात 2 तर नांदेडमधील एकाचा समावेश

1071
प्रातिनिधिक फोटो

साध्या सर्दीपासून थेट श्वास कोंडणाऱ्या विकारापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘कोरोना’ विषाणूने जगातील अनेक देशांमधील नागरिकांना ग्रासले आहे. शेजारच्या चीनमध्ये सुमारे तीन हजार लोकांना या विषाणूची बाधा झाली असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि देशातील वैद्यकीय यंत्रणा ऍलर्ट झाल्या असून राज्यात ‘कोरोना’चे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

अलीकडेच चीनला जाऊन आलेल्या एका व्यक्तीला ‘कोरोना’ची लागण झाल्याच्या संशयावरून पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या आठ रुग्णांना आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात मुंबईतील 5, पुण्यातील 2 तर नांदेडमधील एकाचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णांना कस्तुरबा, पुण्यातील रुग्णांना नायडू तर नांदेडमधील रुग्णाला तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची रक्तचाचणी केली गेली. सुदैवाने कुणीही पॉझिटिव्ह आढळलेले नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

चीनच्या मासळीबाजारातून पसरला विषाणू

कोरोना विषाणू हा प्राण्यांमार्फत मानवामध्ये पसरला. सध्या जगभरात दहशत पसरवणाऱया या विषाणूचे उगमस्थान चीनच्या वुहान प्रांतातील मासळीबाजार आहे. तिथूनच या विषाणूची मानवाला लागण झाल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळतात.

मुंबई विमानतळावर चार हजार प्रवाशांचे स्कॅनिंग

मुंबई विमानतळावर आतापर्यंत सुमारे चार हजार प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. चीन आणि आसपासच्या देशांमधून हिंदुस्थानात उतरणार्या प्रवाशांची यादी बनवून त्यांची चाचणी केली जात आहे. 18 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत अशा 3997 प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात आले.

गोव्यातही एक संशयित रुग्ण

गोव्यातही कोरोना विषाणूचे लागन झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरु आहेत. हा रुग्ण चीनमधून गोव्यात आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज मध्ये 30 खाटांचा विशेष कक्ष बनवण्यात आला असून त्यात 2 आयसीयूचा देखील समावेश आहे. त्याशिवाय दाबोळी विमानतळ आणि मुरगाव पोर्ट पासून जवळ असलेल्या चिखली येथील आरोग्य केंद्रात देखील उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

चीनमधून आलेल्या प्रवाशांची घरी जाऊन तपासणी

चीनमधून आणि विशेषतः तेथील वुहान प्रांतातून हिंदुस्थानात आलेल्या प्रवाशांवर वैद्यकीय यंत्रणेची बारीक नजर आहे. विमानतळांवरून त्या प्रवाशांची यादी घेऊन त्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या