खासगी प्रयोगशाळांनी 24 तासांच्या आत रिपोर्ट द्यावा! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्तांचे निर्देश

646
bmc

कोरोनाची चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांनी नमुने घेतल्यापासून 24 तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल तात्काळ ‘आयसीएमआर’ संकेतस्थळावर अपलोड करावेत आणि त्याची प्रत पालिकेकडे पाठवावी, असे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले.

मुंबईतील खासगी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींसमवेत महापालिका आयुक्त चहल यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बैठक झाली. या बैठकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत कोरोना अहवाल अपलोड करण्यास विलंब होणार नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे प्रयोगशाळांनी लक्ष द्यावे, असेही आयुक्त चहल यांनी निर्देश दिले. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनीदेखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी प्रयोग शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खासगी प्रयोगशाळांद्वारे योग्य प्रकारे कामकाज होत असल्याची आणि कोरोनाविषयक वैद्यकीय अहवाल ‘आयसीएमआर’च्या संकेतस्थळावर निर्धारित वेळेतच अपलोड होत असल्याची खातरजमा नियमितपणे करवून घ्यावी, अशाही सूचना महापालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी दिल्या.

बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि इतर खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

क्वारंटाईन व्यक्तींची वैद्यकीय चाचणी 14 दिवसांच्या आत करा!

ज्या व्यक्ती परदेशातून आल्या आहेत किंवा ज्या व्यक्तींचे घरच्याघरी विलगीकरण करण्यात आले आहे, अशा व्यक्तींचे नमुने घेणे व वैद्यकीय चाचणी करणे याविषयी आवश्यक ती प्रक्रिया 14 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. यासाठीदेखील खासगी प्रयोगशाळांनी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या