ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीत 2 जुलैपासून कडक लॉकडाऊन; मीरा–भाईंदरमध्ये आजपासून टाळेबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अख्ख्या ठाण्यात पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन करायचा की नाही या निर्णयावर सोमवारी दिवसभर सुरू असलेला संभ्रम अखेर मंगलवारी दूर झाला. 2 जुलैला सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत कळवा, मुंब्रासह संपूर्ण ठाण्यात महापालिकेने लॉकडाऊन जाहिर केला आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतही 2 जुलैपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मिरा- भाईंदर महापालिकेने अध्यादेश जारी करून 1 जुलैला सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 10 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टाळेबंदी जाहिर केला.

या लॉकडाऊनच्या काळात या दोन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये फक्त दूध, औषधांची दुकाने, दवाखाने वगळता भाजीपाला, किराणासह सर्व दुकाने बंद म्हणजे बंदच राहणार आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकर, मीरा-भाईंदरकरांनो, 10 दिवस गपगुमान घरात बसा आणि नियम पाळा, अन्यथा पोलिसांचे फटके तर खावे लागतीलच पण तुमच्यावर खटलेही दाखल होतील..

मर्यादित वेळेत दूध, औषधे विक्री

मिरा- भाईंंदर पालिका क्षेत्रामध्ये औषधे व दूध विक्रीसाठी मर्यादित वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दूध डेअरी पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर मेडीकलची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील.

31 जुलैपर्यंत संचारबंदी

ठाणे महापालिकेने 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जारी केला असतानाच ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी 31 जुलैपर्यंत शहरात संचारबंदी लागू केली आहे. रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात पुणालाही प्रवास करता येणार नसल्याचे त्यांनी आदेशात नमुद केले आहे.

कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट

ठाणे जिल्ह्यात सर्वाधीक कोरोनाचे रुग्ण कल्याण डोंबिवलीत झाल्याचे आज स्पष्ट झाले. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजारांच्या वर गेली असून 120 जणांचे बळी गेल्याने हॉटस्पॉट झालेल्या कल्याण डोंबिवलीत दहा दिवसांसाठी पूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रात्री जारी केले. 2 ते 12 जुलै दरम्यान हा लॉकडाऊन असेल असे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

हे बंद राहणार

  • पालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते
  • शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्पेट
  • खासगी कार्यालये, कारखाने, गोदामे
  • मॉर्निग वॉक आणि इव्हिनींग वॉक
  • अंतर्गत रिक्षा, टॅक्सी वाहतूकही

हे सुरू राहणार

  • केवळ दूध विक्रीची दुकाने, मेडिकल आणि डॉक्टरांचे दवाखाने
  • पिठाच्या गिरण्या, मद्यविक्री, पार्सल खाद्यपदार्थ
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना ये-जा करण्याची मुभा
  • बँका, टपाल, आयटीसेवा, हायवे सुरु राहतील, पण वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी