मजूर काम करणाऱ्या महिलेची शाळेत केली प्रसुती, डॉक्टर सोफियांनी केलेल्या मदतीचे कौतुक

541

लॉकडाऊनमुळे खेड बंदरावर जगबुडी नदीच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणारे सुमारे 47 मजूर आणि त्यांचे कुटुंबीय शहरातील उर्दू शाळेत गेले  महिनाभर राहत आहेत. या कुटुंबातील  महिलांपैकी दोन महिला गरोदर होत्या. या महिलांची गेला महिनाभर नगरपरिषदेच्या दवाखान्यामार्फत नियमित तपासणी केली जात आहे.  शनिवारी 25 एप्रिल रोजी मध्यरात्री साडे बारा वाजता यातील रेणुका राठोड या महिलेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने  मोहल्ल्यातील शिक्षक रिफाई यांनी  नगरपरिषद दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सोफिया शेख याना मोबाईलवर फोन करून माहिती दिली. डॉ सोफिया शेख यांनी दुचाकीवरून उर्दू शाळा गाठली. मदतीला आरोग्यसेविका विजया नाईक यांना बोलावले. आरोग्य विभागातील इतर कर्मचारीही फोन केल्यामुळे उर्दू शाळेत पोहोचले होते.

रात्री साडेबारापासून 108 नंबरला फोन केला जात होता. पण तो उचलला जात नव्हता. लॉकडाउनमुळे खासगी वाहने मिळणे अवघड होते. आरोग्य विभागाच्या जीपने  महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार करण्यात आला . पण ते शक्य झाले नाही. वेळ कमी असल्याने नगरपरिषदेच्या डॉ. सोफिया शेख यानी   शाळेतच प्रसूती करण्याची तयारी सुरु केली. आपले सारे वैदयकिय कौशल्य पणाला लावून त्यांनी  त्या महिलेची शाळेतच सुखरूपपणे प्रसूती केली  आणि साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला . रात्री एक वाजून दोन मिनिटांनी रेणूका राठोड या मजूर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी 108 रुग्णवाहिका आली. त्यानंतर त्या महिलेला शहरातील डॉ. समीर मंडपे यांच्या हॉस्पिटलला दाखल करण्यात आले . आता बाळ आणि आई सुखरूप आहेत. त्यांना दवाखान्यातून पुन्हा उर्दू शाळेत आणण्यात आले आहे .

आपली प्रतिक्रिया द्या