मावस भावाने केला भाजप नगरसेवकाचा खून ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पिंपरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी पुणे दौऱ्यावर असतानाच भाजपच्या आळंदी नगर परिषदेतील नगरसेवकांची भरवर्दळीच्या रस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावर चऱ्होलीजवळ मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घटना घडली. या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचेच दिसत आहे. बालाजी कांबळे (३३) असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

आळंदी नगरपालिकेतील नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे यांची दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून झाली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती.  काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसासाठी सुधाकर कांबळे आले होते, इथे त्यांच्यात आणि मावसभाऊ अजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफटा) यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या बरोबर झटपट केली होती. घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीत मेटकरी याने त्यावेळी कांबळेंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही त्याने अनेकवेळा धमकी दिली होती असं घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.