महावितरणच्या कॉस्ट कटिंगचा 460 कंत्राटी वीज कामगारांना झटका; तंत्रज्ञ, यंत्रचालकांचा रोजगार गेला

कोरोना महामारीमुळे महावितरणच्या वीज बिल वसुलीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपनीने अवलंबलेल्या कॉस्ट कटिंगचा मोठा झटका तंत्रज्ञ, यंत्रचालक या पदांवर काम करणाऱ्या धाराशिव आणि गोंदिया जिल्ह्यातील 460 कंत्राटी कामगारांना बसला आहे. दहा-पंधरा वर्षपासून काम करत असतानाही हक्काची नोकरी गेल्याने आता करायचे काय असा प्रश्न संबंधित कामगारांसमोर उभा राहिला आहे.

महावितरणमध्ये एकूण पदाच्या जवळपास 25 हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील 17-18 हजार पदे आहे. रिक्त असलेल्या पदाच्या 95 टक्के पदे कंत्राटी तत्वावर भरावीत असे कंपनीचे 2016 चे परिपत्रक आहे. मात्र कोरोना महामारीमुळे वीज बिलाची वसुली घटल्याने महावितरणचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी रिक्त पदाच्या केवळ 85 टक्के पदे कंत्राटी तत्वावर सुरू ठेवावीत असे परिपत्रक 29 सप्टेंबर रोजी कंपनीने काढले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले तंत्रज्ञ, यंत्रचलक यांची संख्या दहा टक्क्यांनी कमी होणार आहे.

त्याचा पहिला झटका महावितरणच्या धाराशिव, तुळजापूर कार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या 400 कामगारांना बसला आहे. येथे काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांचे कंत्राट 15 ऑक्टोबर रोजी संपले आहे. त्यांना मुदतवाढ देण्याबाबतच्या नव्या निविदेला सहव्यवस्थापकीय संचालक संभाजीनगर यांनी अद्याप मंजुरी दिली नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांची सेवा स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र अधीक्षक अभियंता धाराशिव यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. तर अधीक्षक अभियंता गोंदिया यांनीही तंत्रज्ञ आणि यंत्राचालकांची नियमित पदे भरल्याचे कारण देत विभागातील 30 पदे कमी करण्याबाबतचे पत्र संबंधित मे. पटले कॉन्ट्रक्टर नागपूर यांना दिले आहे. तर अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या 39 कामगारांना कमी केल्याच्या तक्रारी आहेत.

दहा-पंधरा वर्षाची सेवा पाण्यात
महावितरणमध्ये दहा-पंधरा वर्षपासून अनेक कामगार कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कॉस्ट कटिंगसह नियमित पदे भरल्याचे कारण देत प्रशासनाकडून सदर कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली जात आहे. त्यामुळे दहा-पंधरा वर्षे केलेली सेवा पाण्यात गेली अशी भावना कामगार व्यक्त करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या