कापूस विक्रीचा ऑनलाईन मोबदला अडकला, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात

820

माजलगाव तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करत कष्टाने कापसाचं पीक घेतलं होतं. हा कापूस त्यांनी शासकीय खरेदी केंद्राद्वारे विकला. हा कापूस विकल्यानंतर हातात चांगले पैसे येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्याच्या हातात आतापर्यंत मोबदला आलेला नाहीये. हा मोबदला शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा होणार होता. अपुऱ्या मनुष्यबळा अभावी पैसे खात्यात जमा करण्यास विलंब होत आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना इतर दिवसांप्रमाणे आपली काम करता येत नाहीये. जवळपास दीड महिना उलटून गेला तरी कापसाचे पैसे न मिळाल्याने आणि लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे मार्ग कमी झाल्याने माजलगावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

माजलगाव इथे पणन महासंघाच्या वतीने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. हे केंद्र कधी चालू असायचे तर कधी बंद असायचे. शेतकरी आपले केंद्राबाहेर कापूस घेून तासनतास ताटकटळत असायचे. इथे कापूस विकणं हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनलं होतं. बऱ्याच कष्टाने शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विकला. मात्र दीड महिना होऊन गेल्यानंतरही शेतकऱ्यांना कापसाची रक्कम मिळालेली नाहीये. लॉकडाउनच्या काळात काही शेतक-याकडे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही आता पैसे उरलेले नाहीयेत. अडचण दूर करण्यासाठी सरकारने कापसाची रक्कम वितरीत करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. इथल्या केंद्रावर तीस हजार क्विंटल कापस खरेदी करण्यात आला होता आणि त्यापोटी शेतकऱ्यांना जवळपास पंधरा कोटी ऑनलाईन पद्धतीने वितरीत होणं अपेक्षित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या