बीड जिल्ह्यातील कापूस उद्योग उद्ध्वस्त, दीडशे जिनिंग यंदा ही बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

कच्चा माल म्हणजे कापूस उत्पादन डोळ्यासमोर ठेवून बीड जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योग उभे राहिले. मजुरांच्या हाताला काम मिळाले मात्र दुष्काळाच्या दृष्ट चक्रामुळे कापूस क्षेत्र उद्ध्वस्त झाले, उत्पादन प्रचंड घटले म्हणून जिल्ह्यातील दीडशे जिनिंगला यंदा ही कुलुपच लागणार असल्याने कापूस उद्योग अडचणीत आला आहे.

बीड जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन लाख हेक्टर वर कापूस लागवड केली जाते, नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या कापसाच्या पिकाने शेतकऱ्यांना सुरुवातीला साथ दिली दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड डोळ्यासमोर ठेवून बीड जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योग उभे राहिले. जिनिंग प्रेसिंगचे जाळे निर्माण झाले. बाहेरच्या राज्यातून व्यापारी बीडमध्ये आले. उद्योग उभारले जिल्ह्यातीलही व्यापाऱ्यांनी जिनिंग, प्रेसिंगच्या उद्योगात उडी घेतली. हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये जाणाऱ्या कापसावर जिल्ह्यातच प्रक्रिया होऊ लागली. उद्योग भरभराटीला आल्याने, गठणीसह सरकी आणि सरकी पेंडीचा भाव बीडमधून ठरू लागला. ऑइल मिलही उभ्या राहिल्या मात्र नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या कापसाच्या पिकाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले.

गेल्या पाच सहा वर्षांपासून कापसावरील रोगामुळे, निसर्गाच्या अवकृपेमुळे कापूस उत्पादन नुकसानीत येत आहे. झालेला खर्च ही या पिकातून निघेना अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतांना कापूस उत्पादनही घटले आणि याचा परिणाम थेट कापूस प्रक्रिया उद्योगावर झाला. कापूस प्रक्रिया उद्योग अडचणीत आला. या उद्योगाने आणि अनिश्चितता यांमुळे व्यापारी कंगाल झाले. पाच वर्षांपासून जिनिंग प्रेसिंग उद्योगाला घरघर लागली. गत चार वर्षांपासून टप्प्या टप्प्याने जिनिंग बंद पडू लागल्या. यंदाही अडीचशे जिनिंगपैकी तब्बल दीडशे जिनिंग बंदच राहणार असल्याने कापूस प्रक्रिया उद्योग नेस्तनाबूत होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

summary- cotton industry in beed district in danger