
‘मतदार यादी फेरतपासणी अर्थात ‘एसआयआर’ हा सुनियोजित डाव आहे. ही कुठलीही सुधारणा नसून जनतेवर लादलेला अत्याचार आहे. खराखुरा मतदार खचून जावा आणि मतचोरी बेधडक करता यावी हा यामागचा एकमेव हेतू आहे,’ अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली.
बिहारनंतर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ अशा अनेक राज्यांत मतदार फेरतपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा ताण येऊन सहा राज्यांत आतापर्यंत 16 बीएलओंचा (ब्लॉक पातळीवरील अधिकारी) मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील वृत्त ‘एक्स’वर पोस्ट करून मोदी सरकार व निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.
‘एसआयआरच्या नावाने निवडणूक आयोग व केंद्र सरकारने देशभरात गोंधळ माजवला आहे. त्यामुळे तीन आठवडय़ांत 16 बीएलओना आपले प्राण गमवावे लागले. हृदयविकाराचा झटका आणि ताणतणावामुळे काहींनी आत्महत्या केल्या,’ याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.
एसआयआरसाठी आयोगाने केलेल्या व्यवस्थेवरही राहुल यांनी संशय व्यक्त केला. ‘नागरिकांना स्वतःला शोधण्यासाठी 22 वर्षे जुन्या मतदार याद्यांची हजारो पाने तपासावी लागतात. खरेखुरे मतदार थकून जावेत, हतबल व्हावेत आणि राजरोस मतांची चोरी करता यावी हा यामागचा उद्देश दिसतो. सत्तेसाठी लोकशाहीचा बळी दिला जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘एसआयआर हा विचारपूर्वक आखलेला डाव आहे. नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. अनावश्यक ताणामुळं होणाऱया बीएलओंच्या मृत्यूंना ‘अनुषंगिक हानी’ म्हणून दुर्लक्षित केलं जातंय. हे एक षड्यंत्र आहे.’
हेतू स्वच्छ असता तर…
‘हिंदुस्थान हा जगासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर बनवतो, परंतु आपला निवडणूक आयोग अजूनही कागदपत्रांचे जंगल तयार करण्यावर अडून बसला आहे. आयोगाचा हेतू स्वच्छ असता तर डिजिटल, शोधण्यायोग्य आणि मशीनच्या मदतीने वाचता येण्यासारखी यादी त्यांनी दिली असती. फक्त 30 दिवस देऊन घाईघाईत हे काम पूर्ण करण्याचा आटापिटा निवडणूक आयोगाने केला नसता. त्याऐवजी पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे भान राखले असते, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला.





























































