देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार, कमाल वेग ताशी 140 किमी 360 किलो हायड्रोजन वापरून अंदाजे 180 किमी धावणार

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच लाँच होणार आहे. ही ट्रेन हरयाणातील जिंदमध्ये पोहोचली आहे आणि तिच्या ऑपरेशनपूर्वी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण केली जात आहे. सध्या ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटची चाचणी सुरू आहे.

पहिली हायड्रोजन ट्रेन हिंदुस्थानात डिझाईन आणि विकसित करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात लांब आणि शक्तिशाली ब्रॉडगेज हायड्रोजन ट्रेन मानली जात आहे. ही ट्रेन 20 जानेवारीनंतर जिंद-सोनीपत मार्गावर धावेल. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 140 किलोमीटर आहे.

सध्या ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटच्या चाचण्या सुरू आहेत. सर्व सुरक्षा चाचण्या झाल्यानंतर ट्रेनला हिरवा पंदील दाखवला जाईल आणि ती प्रवाशांसाठी नियमित सुरू होईल. अद्याप ट्रेनच्या लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

हायड्रोजन ट्रेनला 10 डबे आहेत. एकूण 2400 किलोवॅट पॉवर आहे. तिचा कमाल वेग ताशी 140 किलोमीटर आहे. ट्रेनमध्ये दोन ड्रायव्हिंग पॉवर कार आहेत. प्रत्येकाची क्षमता 1200 किलोवॅट आहे.

एकावेळी अंदाजे 2500 प्रवासी प्रवास करू शकतात. इंधनाच्या बाबतीत ही ट्रेन 360 किलोग्रॅम हायड्रोजन वापरून अंदाजे 180 किलोमीटर प्रवास करू शकते.

ट्रेन धावत असताना कोणताही आवाज होणार नाही. प्रवाशांना शांत आरामदायी प्रवास मिळेल. प्रत्येक कोचमध्ये पंखे, लाईट, एसी, डिजिटल डिस्प्ले आहेत.