
पतीला आयटी कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उच्चशिक्षित पत्नी, अलिशान राहणीमानाला बाळाचा अडथळा ठरल्यामुळे दांपत्याने ठरवून दोन महिन्यांच्या चिमुरड्याला रस्त्यावर सोडले. त्यानंतर बाळ दगावल्याची माहिती नातेवाईकांनाही दिली. मात्र, खडकी पोलिसांच्या तपासामुळे उच्चशिक्षित क्रूर दांपत्याला अटक करण्यात आली आहे.
खडकीतील मेथॉडिस्ट चर्च परिसरात दोन दिवसांपुर्वी सकाळी बाळाला रस्त्यावर फेकून दिल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे संबंधित बाळाच्या आई- वडिलांचा शोध घेउन घटनेचा पर्दाफाश केला आहे. संबंधित सुशिक्षित दांपत्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्यामुळे ते विभक्त होते. मात्र, लॉकडाउनमध्ये ते पुन्हा एकमेकांसोबत राहत होते. ऑगस्टमध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर पतीने पत्नीवर पुन्हा संशय घेत भांडणे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती-पत्नीत पुन्हा वाद होऊ लागले. त्याचा परिणाम संसारावर होउ नये म्हणून दांपत्याने बाळाला सोडून देण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यासाठी त्यांनी बाळाला एका पिशवीत घालून खडकीतील चर्च परिसरात रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
रस्त्यावर सापडलेल्या बाळाचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यावेळी एकाने व्हॉट्सअॅपवर बाळाचा फोटो ठेवून ‘मिस यू’ असे लिहिल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, हा माझ्या बहिणीचा मुलगा असून त्याचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याचे सांगितल्यावर पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी संबंधिताला बाळ जिवंत असून त्याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. त्यानंतर मामाने ससून रुग्णालयात जाऊन पाहिले असता बाळ जिवंत असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर संबंधिताने पोलिसांना त्याच्या बहिणीचा पत्ता दिला. त्यानंतर पोलिसांनी दांपत्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वादातून आम्ही बाळाला रस्त्यावर ठेवल्याची कबुली दिली. याप्रकरणी उच्चशिक्षित दांपत्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ यांनी दिली.
संबंधित दांपत्यामध्ये सातत्याने वादविवाद होत होते. त्यामुळे सोबत राहायचे असल्यास मुलाचा त्याग करावा लागेल असे पतीने पत्नीला सांगितल्यावर दोघांनी मिळून त्या चिमुकल्याला रस्त्यावर सोडून दिले होते.
– राजेंद्र सहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी





























































