युवकाकडून पावणेतीन लाख रुपये उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक, वाई तालुक्यात हनीट्रॅपची घटना उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हनीट्रॅपची एक धक्कादायक घटना वाई तालुक्यात उघडकीस आली आहे. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दाम्पत्याला अटक केली असून, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पूनम हेमंत मोरे (वय 30) व हेमंत विजय मोरे (वय 31, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. कुडाळ, ता. जावली) अशी संशयितांची नावे आहेत.

कामाच्या निमित्ताने परपुरुषाशी ओळख वाढवून त्यानंतर व्हॉट्सऍपवर अश्लील चॅटिंग करून व बदनामी करण्याची भीती दाखवून या दाम्पत्याने एका युवकाकडून 2 लाख 89 हजार 500 रुपये उकळले. वाई तालुक्यातील बोपेगाव येथील हा 30 वर्षीय युवक एका पतसंस्थेत शिपाई म्हणून कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी पूनम मोरे हिने बँकेत काम मिळेल का, याबाबत विचारणा करून त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर व्हॉट्सऍपवर चॅटिंग सुरू केले. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर एकदा भेटायचे आहे, असे म्हणून त्याला एका लॉजवर बोलाविले. दुसऱया दिवशी भेटायचे ठरले होते. दरम्यान, अश्लील चॅटिंग सुरू होते. त्यानंतर हेमंत मोरे याने माझ्या बायकोला लॉजवर का बोलावले, असा जाब विचारून व्हॉट्सऍपवरील अश्लील मेसेज तुझ्या घरच्यांना दाखवतो आणि तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढतो, अशी धमकी दिली. बदनामी करण्याची भीती घालून दोघांनी त्याच्याकडून वेळोवेळी 2 लाख 89 हजार 500 रुपये उकळले. त्याने रोख स्वरूपात, बँक खात्यावर व फोनपेद्वारे पैसे दिले.

वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्याने त्याने वाई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पूनम व हेमंत मोरे या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुह्याच्या प्राथमिक तपासणीत संशयितांनी आणखी काही लोकांना आपल्या जाळय़ात ओढून अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे; परंतु बदनामी होईल यामुळे कोणी तक्रार देण्यात पुढे येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.

वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक सोनाली माने, अमित गोले, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांनी ही कारवाई सहभाग घेतला.