
सामना ऑनलाईन । शिवपुरी
एखाद्या गुन्ह्यासाठी आरोपीला पोलीस ठाण्यात हजर केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आरोपी जर माणूस नसून पक्षी असेल तर? तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय मध्यप्रदेशातील शिवपुरीत आला आहे. कारण, आठ महिन्यांच्या चिमुरडीला चावला म्हणून चक्क एका कोंबड्याला पोलिसात हजर करण्यात आलं आहे.
शनिवारी शिवपुरी येथील पोलीस ठाण्यात कुशवाह नावाचं एक जोडपं तक्रार घेऊन दाखल झालं. त्या जोडप्याकडे आठ महिन्याची मुलगी होती. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारी भाड्याने राहणाऱ्या एका कुटुंबाने पाळलेल्या कोंबड्याने मुलीचा चावा घेतला होता. ही त्याची चावण्याची तिसरी वेळ असल्याने ते दोघंही तक्रार घेऊन पोलिसात आले होते. कोंबड्याच्या चावण्यामुळे वैतागलेल्या कुशवाह जोडप्याने त्याला अटक करण्याचा हट्ट पोलिसांकडे धरला. हा विचित्र हट्ट ऐकून पोलीसही चक्रावले. थोड्यावेळाने कुशवाह यांचा शेजारी त्या ‘चावऱ्या’ कोंबड्याला घेऊन हजर झाला.
शेजाऱ्याने पोलिसांना विनंती केली की, आम्हाला अपत्य नसल्याने आम्ही या कोंबड्याला पाळलं आहे. त्यामुळे कृपया त्याला अटक करू नका. वाटल्यास यापुढे आम्ही त्याला बांधून ठेवू, असं त्यांनी पोलिसांना दिलं. तरीही दिवसभर कुशवाह जोडपं तिथेच बसून होतं. पोलिसांनी कसंबसं त्यांना समजावलं आणि परत घरी पाठवून दिलं.

























































