
मुलाला कोल्हापूरहून आणण्यासाठी निघालेल्या हडपसर (पुणे) येथील दांपत्यावर शनिवारी पहाटे काळाने घाला घातला. भरधाव कारच्या चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर पत्नी व तिचा पती असे दोघेजण जागीच ठार झाले. पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यापासून 31 किलोमीटर अंतरावर उंब्रजजवळील भोसलेवाडी गावच्या हद्दीत पहाटे पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अमित आप्पाजी गावडे (वय ३८), डॉ. अनुजा अमित गावडे (वय ३५, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा ते कराड लेनवरून कोल्हापूरकडे जाणारी कार (एमएच १२ जेयू ८८९२) ही भोसलेवाडी हद्दीतून भरधाव वेगात जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गावरील दुभाजकाला धडकून सातारा लेनवर पलटी झाली. यामध्ये कारमधील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे जागीच ठार झाले.
अपघातातील दांपत्य कोल्हापूरमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी जात होते असे समजते. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. या दुर्घटनेबद्दल परिसरात लोकांनी हळहळ व्यक्त केली.

























































