संभाजी महाराजांच्या साक्षीने केला साधेपणाने विवाह, विवाहाच्या खर्चाला फाटा देण्याचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वत्र उदासीन वातावरण असून शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. अशावेळी थाटामाटात लग्न न करता अवाढव्य खर्चाला फाटा देत मराठा क्रांती मोर्चा आणि राजेंद्र पवार मित्रमंडळाच्या प्रयत्नाने एका जोडप्याचा आज सोमवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विवाह पार पडला. टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत हे जोडपे विवाहबंधनात बांधले गेले.

जालना जिल्ह्यातील शिंदी पिंपळगाव येथील प्रदीप शंकर शिरसाट आणि फुलंब्री तालुक्यातील सांजूळ येथील पूजा नवनाथ जाधव या जोडप्याचा साक्षगंध सोहळा आज सोमवारी निर्मल लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. दोन्ही पक्षांकडील अंदाजे २०० च्या वर वऱ्हाडी मंडळी जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी कार्यालयात हजर झाली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आणि राजेंद्र पवार मित्रमंडळाने कार्यस्थळी जाऊन दोन्ही पक्षांची भेट घेतली. सध्या दुष्काळी परिस्थिती असून, लग्नात अवाढव्य खर्च करणे योग्य नाही. दुष्काळामुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. अशावेळी पैशांचा अवाढव्य खर्च नको, लग्न हे दोन मनांचे, दोन परिवारांचे मिलन असल्याने साध्या पद्धतीने लग्न करावे, अशी विनंती करण्यात आली.

यावर एकमत होऊन टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साक्षगंधाऐवजी थेट लग्नच करण्याचा निर्णय घेण्यात आला. लगोलग सर्व वऱ्हाडी मंडळी टीव्ही सेंटरवर जमली आणि चौकाला एखाद्या कार्यस्थळाचे स्वरूप आले. गुरुजींनी मंगलाष्टके म्हटली आणि हा आगळावेगळा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. या सोहळ्यासाठी राजेंद्र पवार, राजू चव्हाण, प्रभाकर मते पाटील, गणपत म्हस्के, गजानन उगले, सतीश वेताळ, अनिल बोरसे, तात्या घोडके, आप्पासाहेब बुधेकर आदींनी परिश्रम घेतले.