लिव इनमधील जोडप्यांची नवरा-बायको म्हणून गणना, उद्यापासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात होणाऱ्या 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा उद्या, 1 एप्रिल 2026 पासून सुरू होत आहे. हा पहिला टप्पा 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 33 प्रश्न तयार केले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जनगणेत आता लग्नाची झंझट नको म्हणून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची नवरा-बायको म्हणून गणना केली जाणार आहे.

हिंदुस्थानच्या रजिस्ट्रार जनर अ‍ॅण्ड सेंसस कमिशनर आणि जनगणना आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव इन रिलेशनशीपमध्ये राहणारे जोडपे जर आपल्या नात्याला एक कायमस्वरूपी मानत असतील तर त्यांना एक विवाहित जोडपे म्हणून नोंदणी करावी लागेल. या मुद्द्यावर सरकारकडून पहिल्यांदा सार्वजनिकरित्या स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यंदा स्व-गणना पोर्टलवर स्वतः फॉर्म भरून नोंदणी करता येईल. यंदाची जनगणना ही र्प्णूपणे डिजिटल पद्धतीची असणार आहे. जनगणनेसाठी जवळपास 32 लाख कर्मचारी मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती गोळा करतील. मोबाइल अ‍ॅप, पोर्टल, रिअल टाइम डेटा ट्रान्सफरमुळे जनगणना मोठ्या प्रमाणात पेपरलेस होईल. जनगणनेसाठी वापरले जाणार अ‍ॅप हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर काम करेल. जातीशी संबंधित डेटादेखील डिजिटल पद्धतीने गोळा केला जाईल.

जनगणनेसाठी 33 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील

इमारत क्रमांक, घर क्रमांक, घराच्या फरशीमधील मुख्य साहित्य, घराच्या भिंतीमध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य, घराच्या छतामध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य, घराचा उपयोग, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, कुटुंबप्रमुखाचे लिंग, अनुसूचित जाती-जमाती-इतर, घराच्या मालकीची स्थिती, घरातील खोल्यांची संख्या, कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या, मोबाइल क्रमांक, मुख्य धान्य, कार-जीप-व्हॅन, सायकल-मोटरसायकल्, टेलिफोन-मोबाईल-स्मार्टफोन, लॅपटॉप-कॉम्प्युटर, इंटरनेट, दूरदर्शन, रेडिओ, स्वयंपाकासाठी मुख्य इंधन, स्वयंपाकघर एलपीजी-पीएनजी कनेक्शन, स्नानगृहाची उपलब्धता, सांडपाण्याचा निचरा, शौचालयाचा प्रकार, शौचालयाची उपलब्धता, प्रकाशाचा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याची स्रोताची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत.