
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडने केलेला दोषमुक्तीचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला मात्र संपत्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणातील विष्णू चाटेसह इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी तर वाल्मीक कराडने जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात न्या. व्ही. एच. पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मीक कराडच्या दोषमुक्ती तसेच संपत्ती जप्त करण्याच्या अर्जाला जोरदार विरोध केला होता. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने या अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. पाटवदकर यांनी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे तर संपत्ती जप्त करण्यास विरोध करणाऱया अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीसह खुनाचा खटला चालू राहणार आहे.