
कोरोनाची दुसरी लाट संपत नाही तोच तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. तिसरी लाट कधीही येईल अशी भीती व्यक्त केली जात असतानाच आता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉ. समीरन पांडा (Samiran Panda) यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘NDTV’ शी बोलताना डॉ. समीरन यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विधान केले.
ते म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेएवढी धोकादायक ठरणार नाही. परंतु संपूर्ण देश तिसऱ्या लाटेमध्ये भरडून जाईल. तसेच कोरोना महामारीच्या काळात लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. हे देखील तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरू शकते. कारण कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक सहजपणे कोरोनाच्या या लाटेत संक्रमित होई शकतात. असेही डॉ. समीरन पांडा म्हणाले.
नवा व्हेरिएंट संक्रमण वेगाने पसरवू शकतो
कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये नव्याने प्रतिकारशक्ती निर्मा होते. परंतु नवीन व्हेरिएंट या प्रतिकारशक्तीलाही कमकुवत करू शकतो. त्यामुळे संक्रमण वेगाने पसरू शकते, असेही डॉ. समीरन पांडा म्हणाले. तसेच डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरिएंट अधिक धोकादायक होती असे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.
डब्ल्यूएचओने दिला सावधगिरीचा इशारा
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या व तितक्याच पटीने कोरोनाबळींचा आकडा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करीत ‘डब्ल्यूएचओ’ने संपूर्ण जगाला तिसऱ्या लाटेबाबत खबरदारीचा इशारा दिला आहे. कोरोना विषाणू सतत आपले रूप बदलत असून धोकादायक व्हेरिएंट्सच्या माध्यमातून तो आघात करीत आहे. हा विषाणू अधिक संसर्गजन्य बनत चालला आहे. सर्वात आधी हिंदुस्थानात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटने आतापर्यंत 111 हून अधिक देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. ही सुरुवात आहे. पुढील काही महिन्यांत हा विषाणू संपूर्ण जगभर पसरू शकतो, असे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात तिसऱया लाटेच्या तीव्रतेबाबत अॅलर्ट करण्यात आले आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी बनवलेल्या ‘इमर्जन्सी कमिटी’ला ‘डब्ल्यूएचओ’ने सावध केले आहे.


























































