
देशात ओमायक्रोन विषाणू वेगाने पाय पसरू लागल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ओमायक्रोनचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सावध राहा, या विषाणूला गांभीर्याने घ्या. याच्या संसर्गावर सध्याच्या कोरोना प्रतिबंधक लसी कुचकामी ठरू शकतील, अशी भीती कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ओमायक्रोनचे नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन व सरकारची चिंता वाढली आहे. या अनुषंगाने कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. पॉल यांनी ऍलर्ट करताना ओमायक्रोनला हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला आहे. देशात ओमायक्रोनचा शिरकाव होऊन तीन आठवडे झाले आहेत. या कालावधीतील संसर्गाचा विचार करता विषाणूपुढे सध्याच्या लसी परिणामकारक ठरणार नाहीत अशीही परिस्थिती येऊ शकेल. देशात कमी किंवा मध्यम स्वरूपाचा संसर्ग पसरू शकेल. याच दिशेने सध्या ओमायक्रोन संसर्गाची वाटचाल सुरू आहे. आपल्याकडे या विषाणूबाबत अजून संपूर्ण माहिती नाही. लसी किती परिणामकारक ठरतील याबाबतही काही ठोस सांगू शकत नाही. तथापि, आपण ओमायक्रोनला हलक्यात घेऊन चालणार नाही, असे डॉ. पॉल यांनी म्हटले आहे.
सध्याच्या लसी कुचकामी ठरण्याची शक्यता; गरजेनुसार लसींमध्ये बदल करावा लागणार
कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट धडकत आहेत. हिंदुस्थान दरवर्षी साथीच्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे देशाला लसीचे विशिष्ट प्लॅटफॉर्म तयार केले पाहिजे ज्या अंतर्गत विषाणूचा नवा व्हेरिएंट आला तर त्यावेळच्या गरजेनुसार लसींमध्ये वेगाने बदल करता येईल. जेणेकरून नव्या व्हेरिएंटवर लस परिणामकारक ठरेल. दर तीन महिन्यांनी शक्य होणार नाही, परंतु प्रत्येक वर्षी लसींमध्ये बदल करता येऊ शकेल, असेही डॉ. पॉल यांनी नमूद केले.




























































