दुसरा डोस घेताच भिवंडीत वाहनचालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड लसीचा दुसरा डोस घेताच प्रतीक्षा कक्षात बसलेल्या वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीत घडली आहे. सुखदेव किर्दत (45) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव असून भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला आहे.

ठाण्याच्या मनोरमानगर येथे राहणारे सुखदेव किर्दत हे भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता ते कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात गेले होते. ठरल्याप्रमाणे दुसरा डोस घेऊन ते तेथील प्रतीक्षागृहात थांबले होते.

मात्र जवळपास पंधरा मिनिटांनंतर त्यांना अचानक भोवळ आल्याने ते खाली पडले. या केंद्रातील कर्मचाऱयांनी तातडीने किर्दत यांना स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागचे कारण कळेल, अशी प्रतिक्रिया भिवंडी पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली.