
हिंदुस्थानात कोरोनाची तिसरी लाट तीन महिन्यांत ओसरली आहे. लसीकरण व चाचण्यांचा विक्रम यामुळे कोरोना आटोक्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासांत 9 हजार 754 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील 59 हजार 442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात जानेवारीत महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यादरम्यान दररोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. मात्र आता कोरोनाचे प्रमाण मंदावला असून, जानेवारीच्या तुलनेत कोरोना सक्रिय रुग्णात आता 96 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
देशात सुरुवातीला दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात आदी राज्यांत कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. देशात एकूण बाधितांचा आकडा 4 कोटी 29 लाखांवर गेला असून, 4 कोटी 23 लाख 88 हजार जण कोरोनामुक्त झाले. राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत लसीकरणाचा एकूण आकडा 178 कोटींपार गेला आहे.
COVID19 | India records 5,476 new cases, 158 deaths and 9,754 recoveries in the last 24 hours; Active cases stand at 59,442 pic.twitter.com/xXECapxU4A
— ANI (@ANI) March 6, 2022
जगात कोरोनाने 60 लाख जणांचा मृत्यू
जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून, 9 लाख 81 हजार 729 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत 44 कोटी 26 लाखांहून अधिक बाधित आढळले आहेत. तर 60 लाख 3 हजार 912 जणांचा बळी गेला आहे. सध्या 6 कोटी 10 लाख रुग्णांवर उपचार सुरू असून, 37 कोटी 56 लाख 28 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत अमेरिकेत 8 कोटी 8 लाख 43 हजार बाधित आढळले असून, 6 कोटी जण कोरोनामुक्त झाले. सध्या अमेरिकेत 2 कोटी 50 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये 2 कोटी 89 लाख 6 हजार बाधित तर 6 लाख 50 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.




























































