हिंदूस्थानात तिसरी लाट येण्याचे चिन्ह कमी, पण कोविड – 19 संबंधित नियमांचे पालन करावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्‍ट्रासह भारतातील अनेक राज्‍यांमध्‍ये कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत एक-एक गोष्टी काळजीपूर्वक सुरू करण्यात येत आहेत. मुंबईमध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. शाळांच्या ठराविक इयत्तांचे वर्ग सुरू करणे, धार्मिक स्थळे खुली करणे हे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. चित्रपट-नाट्यगृहे देखील 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र लसीकरण, नागरिकांमध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी गरजेच्या असलेल्या अँटीबॉडी तयार होणं, केंद्र तसेच राज्य सरकारने घालून दिलेले निर्बंध यामुळे ही लाट अद्याप आलेली दिसत नाही. यामुळे तिसरी लाट येणार का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात होता. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि फोर्टिस हॉस्पिटल्‍स मुंबईचे क्रिटीकल केअरचे संचालक डॉ.राहुल पंडीत यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी लिहिलेला हा विशेष लेख.

महाराष्‍ट्रासह भारतातील अनेक राज्‍यांमध्‍ये विविध गोष्टींना पुन्‍हा जोमाने सुरूवात होत असली तरी लोकांमध्‍ये अजूनही कोविड-19 च्‍या संभाव्‍य तिस-या लाटेबाबत चिंता आहे.  चांगली बाब ही आहे की देशात आणि खासकरून महाराष्ट्रात लसीकरणाला गती मिळाली आहे. सप्‍टेंबरपासून आपल्‍या हिंदुस्थानात दिवसाला 60 ते 70 लाख लोकांचे लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण अधिक होतं तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून रुग्णांचा आकडाही कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटा सर्वाधिक फटका बसलेल्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये पॉझिटिव्‍हीटी दर कमी दिसून येत आहे. तसेच केरळ राज्‍यामध्‍ये देखील पॉझिटिव्‍हीटी दर कमी दिसून येत आहे. दुसरी बाब म्‍हणजे मुंबईमध्ये नुकत्याच करण्‍यात आलेल्‍या सेरोसर्वेमधून निदर्शनास आले की, जवळपास 70 ते 80 टक्‍के लोकांमध्‍ये आता कोविड-19 विरोधात लढण्‍यासाठी अॅण्‍टीबॉडीज आहेत.

महाराष्‍ट्रात विशेषत: मुंबईत ५० टक्‍के लोकांचे लसीकरण संपूर्ण झाले आहे (म्‍हणजेच लोकांना लसीचे दोन्‍ही डोस मिळाले आहेत) आणि जवळपास 90 टक्‍के लोकांना एक डोस मिळाला आहे. यामुळे लोकांमध्‍ये आजाराच्‍या माध्‍यमातून व लसीकरणाच्‍या माध्‍यमातून अ‍ॅण्‍टीबॉडीज तयार झाल्‍या आहेत. आणखी एक बाब समजून घेण्‍याची गरज आहे की, दुसरी लाट मुख्‍यत: डेल्‍टा व्‍हेरिअंटमुळेच आली होती. डेल्‍टा हा इतर व्‍हेरिअंटपेक्षा अधिक संसर्गजन्‍य स्वरुपाचा होता आणि त्‍याचा इन्क्युबेशन (वाढीचा) कालावधी 2 ते 4 दिवस होता. जर डेल्‍टा व डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिअंटमधील विषाणूच्‍या दराची तुलना केली तर त्‍यांच्‍यामध्‍ये फार फरक आढळून येत नाही. मागील अहवाल पाहता देशामध्‍ये वर्षाच्‍या सुरूवातीला डेल्‍टाने थैमान घातल्‍यानंतर कोरोनाविषाणूचा कोणताही नवीन व्‍हेरिअंटचा प्रादुर्भाव दिसण्‍यात आलेला नाही.

हे सर्व पाहता, हिंदुस्थानात तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता फारच कमी आहे. पुन्हा कोरोनाची लाट आलीच तर ती पहिल्‍या दोन लाटांच्‍या तुलनेमध्‍ये या लाटेमध्ये रूग्‍णांची संख्‍या कमी असेल . यापुढे कोरोनाची लाट आल्यास रूग्‍णांवर क्‍वारंटाइन केंद्रांमध्‍ये किंवा घरामध्‍ये सुलभपणे उपचार करता येतील. लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने गंभीर किंवा मध्‍यम स्वरुपाचा संसर्ग झालेल्या रूग्‍णांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. केंद्र तसेच राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास येणारी लाट 2-3 महिने पुढे जाऊ शकते किंवा आपल्याला आणखी एका घातक लाटेचा सामना करावा लागणार नाही. कोरोनावरील लस घेण्यासोबतच नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सतत हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं आहे, कोरोनाविरोधात लढाई जिंकण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि या लढ्यात अग्रभागी असलेल्या सर्व सरकारी यंत्रणांना सहाय्य करणेही तितकेच गरजेचे आहे.