१ ऑगस्ट पासून भाकप ची  ‘भाजप हटाव, देश बचाव’ जनजागरण मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन ।नगर

भाजप सरकारने आपल्या चार वर्षाच्या सत्ता काळात निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली कुठलीही आश्वासने न पाळल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या वाढल्या. अशा या नाकर्त्या, जनविरोधी व कार्पोरेट धार्जिन्या सरकारच्या कारभाराचा पोल खोल करण्यासाठी भाकप च्या वतीने १ ते १४ ऑगस्ट या काळात ‘संविधान बचाव, भाजप हटाव, देश बचाव’ ही राष्ट्रीय पातळीवरील जनजागरण मोहीम राबविण्यात येणार आहे. बुधवार दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. प्रोफेसर कॉलोनी चौकातील जाहीर सभेद्वारे  नगर जिल्ह्यातील या मोहिमेस प्रारंभ होणार आहे.

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये प्रत्येक वर्षी २ कोटी तरुणांना नोकऱ्या देणार, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या अधिक ५० % नफा असा हमीभाव देऊ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, परदेशातील काळा पैसा भारतात आणू अशी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन आएंगे’ असे स्वप्न दाखवले होते. परंतु प्रत्यक्षात यातील एकही आश्वासन न पाळता, नोटा बंदी व जी.एस.टी. लागू करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या अडचणीत भर घातली. दलित, अल्पसंख्याक व  स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली. पेट्रोल व डिझेल चे दर दररोज वाढत असल्यामुळे देशात महागाई वाढली. मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवत झुलवत ठेवले. राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार केला.

भाजप सरकारच्या ४ वर्षाच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुटण्या ऐवजी वाढत गेल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार असा सर्व वर्ग या सरकारवर नाराज आहे. या जातीयवादी सरकारचा भांडा फोड करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात एकूण १०० सभा भाकप च्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती भाकपच्या सचिव मंडळाचे सदस्य नामदेवराव चव्हाण यांनी बुरुडगाव रोड वरील भाकप कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. प्रत्येक तालुक्यातील प्रमुख गावात भाकचे प्रमुख पदाधिकारी भाजपच्या गैर कारभाराबद्दल जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे मुळा, भंडारदरा व इतर धरणातील पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सोडण्यात यावे, सरकारने जाहीर केलेली पाच रुपयांची दूध दरवाढ प्रत्यक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. या बैठकीस भाकप चे राज्य सहसचिव अॅड.कॉ.सुभाष लांडे, भारतीय किसान सभेचे अॅड.कॉ.बन्सी सातपुते व इतर मान्यवर उपस्थित होते.