मालवण : स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ‘खड्ड्यात’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

शहरातील देऊळवाडा आडवण येथील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी खड्यात साचून मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, रस्त्यावरून ये-जा करताना तसेच एखाद्या मृत व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत नेताना समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील आडवण भागात येथील पालिकेने उभारलेली स्मशानभूमी आहे. देऊळवाडा येथील मुख्य रस्त्यावरून आडवण वायरी येथे जाणार्‍या रस्त्यावरच ही स्मशानभूमी आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाणार्‍या या रस्त्याची अवस्था बिकट अशीच आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून ये-जा करणे पादचार्‍यांना व वाहनचालकांना मुश्कील बनले आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे आणखी मोठे बनले असून रस्ता चिखलमय बनला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्‍या नागरिक व वाहनचालकांना मोठी कसरत करत वाट काढावी लागत आहे.

दरम्यान, या रस्त्याला लागून महावितरणचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या बाजूला महावितरणकडून बांधलेल्या इमारतीच्या कामावेळी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रस्त्याची पालिकेने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.