बीसीसीआयने कमावले 4 हजार कोटी, कोरोनाच्या काळातही आयपीएलने तारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने कोरोनाच्या काळातही आपली तिजोरी भरली. आयपीएल स्पर्धा यावेळी त्यांच्यासाठी धावून आली. एकीकडे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारखे क्रिकेट बोर्ड आर्थिक अडचणीत असताना बीसीसीआयने मात्र आपला गल्ला भरला. यूएईत सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेमुळे बीसीसीआयला तब्बल 4 हजार कोटींचा फायदा झाला.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमळ यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले की, गेल्या आयपीएलच्या तुलनेत या वर्षी झालेल्या आयपीएलदरम्यान खर्चामध्ये 35 टक्के कपात केली. टेलिव्हीजन प्रक्षेपणात 25 टक्के वाढ झाली. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामधील सलामीची लढत टेलिव्हीजनवर सर्वाधिक बघितली गेली. आयपीएल स्पर्धा या वर्षी झाली नसती तर क्रिकेटपटू एका वर्षाला मुकले असते. यूएईतील क्रिकेट बोर्डाकडूनही मोलाचे सहकार्य लाभले. बीसीसीआयला आयपीएलद्वारे चार हजार कोटींची कमाई करता आलीय.

  • पाच परदेशी खेळाडूंना मुभा?

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने या आयपीएल मोसमात शानदार कामगिरी करीत पाचव्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आता 2021 सालामध्ये होणाऱया आयपीएलचे वेध सर्वांनाच लागले. संघमालकांकडून गेल्या काही मोसमांपासून एक मागणी करण्यात येत आहे. अंतिम अकरा जणांच्या चमूत पाच परदेशी खेळाडू असायला हवेत असे त्यांना वाटते. पण बीसीसीआयकडून याबाबतच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, काही संघमालक अंतिम 11 जणांच्या चमूतील परदेशी खेळाडूंची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी करीत आहेत. या वर्षीही त्यांच्याकडून विनंती करण्यात आलेली आहे. आम्ही यावर अद्याप चर्चा केलेली नाही. योग्य वेळ पाहून याबाबत चर्चा करू, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.